
* सेबीची ‘समजून गुंतवणूक करणे सोपे’ ही संकल्पना केंद्रस्थानी
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) मार्गदर्शनाखाली देशभरात आर्थिक साक्षरता, गुंतवणूकदार शिक्षण आणि गुंतवणूकदार संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ज्ञान देणे आणि प्रतिभूती बाजारात माहितीपूर्ण, जबाबदार व सुरक्षित सहभागासाठी प्रोत्साहित करणे, हे एनएसईचे उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिभूती आयोग संघटनेच्या (आयओएससीओ) मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाची (डब्ल्यूआयडब्ल्यू) ही दहावी आवृत्ती भारतात ५ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरी केली जात आहे. यंदाची संकल्पना ‘समजून गुंतवणूक करणे सोपे’ अशी आहे.
‘समजून गुंतवणूक करणे सोपे’ ही सेबी आणि प्रतिभूती बाजारातील भागीदार संस्था (एसएमपी) यांच्यातर्फे राबवली जाणारी एकात्मिक गुंतवणूकदार जागरूकता आणि शिक्षण मोहीम आहे. गुंतवणूकदारांना शिक्षण आणि जागरूकतेच्या माध्यमातून गुंतवणूक प्रक्रिया सोपी करून समजावून सांगणे, तसेच माहितीपूर्ण आणि जबाबदार गुंतवणूक निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. विविध गुंतवणूक उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि त्यांतील जोखीम समजून घेणे, गुंतवणूक मंचांची आणि पैशांची मागणी करणाऱ्या विनंत्यांची सत्यता पडताळणे आणि विचारपूर्वक गुंतवणूक निर्णय घेणे, यासाठी ही मोहीम गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करते.
सेबीचे पूर्णवेळ सदस्य श्री. संदीप प्रधान यांनी ‘प्रोजेक्ट जागरूक’ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘समजून गुंतवणूक करणे सोपे’ या संकल्पनेतून प्रतिभूती बाजाराची संपूर्ण व्यवस्था समजण्यास सोपी करण्यासाठी आणि नागरिकांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यासाठी समन्वित व व्यापक उपक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी सेबी करत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. यामध्ये सेबी चेक (SEBI Check) साधन, सारथी २.० (Saa₹thi 2.0) ॲप आणि सेबीकडे नोंदणीकृत दलालांच्या ॲपसाठीचे व्हेरिफाइड बॅज यांचा समावेश आहे. सुरक्षित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, गुंतवणूकदारांची फसवणूक रोखणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे, या उद्देशाने सेबी विविध उपक्रम राबवत आहे.
एनएसईचे कार्यकारी संचालक श्री. संजय शौरी यांनी ‘प्रोजेक्ट जागरूक’ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि बाजारात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देतानाच आर्थिक जागरूकता वाढवण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. दीर्घकालीन गुंतवणूक, आर्थिक शिस्त, जोखमीची समज आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर यांचे महत्त्व त्यांनी विशद केले.
शहरी तसेच ग्रामीण भारतात गुंतवणूकदार जागरूकतेचा विस्तार करणे आणि महिलांचा गुंतवणुकीतील सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. आर्थिक शिक्षण, गुंतवणूकदार संरक्षण आणि अधिक जागरूक, आत्मविश्वासपूर्ण व आर्थिक धक्के सहन करण्यास सक्षम गुंतवणूकदार समुदाय घडवणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सक्षम करण्याची आपली बांधिलकी एनएसईने पुन्हा अधोरेखित केली.
एनएसईचे मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी श्री. पियुष चौरसिया यांनी मान्यवर आणि उपस्थितांना संबोधित केले. जागतिक गुंतवणूकदार सप्ताह हा गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जगभरातील शेअर बाजार व नियामक संस्थांकडून साजरा केला जाणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी आणि ट्रकचालक या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये गुंतवणूकदार जागरूकता वाढवण्यासाठी भागीदार संस्थांसोबत केलेल्या सामंजस्य करारांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. ‘प्रोजेक्ट जागरूक’अंतर्गत होणाऱ्या या सहकार्यामुळे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडतील आणि आगामी वर्षांत नागरिकांना आर्थिक ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार लिमिटेड आणि विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनासाठीचे विग्नान फाउंडेशन (Vignan's Foundation for Science Technology and Research) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याच्या ‘मस्ट’ (MUST — Mentoring of University/College Students by Trainers) उपक्रमांतर्गत आर्थिक साक्षरता आणि प्रतिभूती बाजारातील गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी भागीदार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांची क्षमता विकसित करणे, हे उद्दिष्ट आहे.
भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार लिमिटेड आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन (एआयटीडब्ल्यूए) यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार एनएसई ही एआयटीडब्ल्यूएची ज्ञानविषयक भागीदार संस्था म्हणून काम करेल. विकसित केलेली किंवा उपलब्ध करून दिलेली सामग्री एआयटीडब्ल्यूएचे सदस्य, त्यांचे कर्मचारी आणि संस्थेने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक साक्षरता, गुंतवणूकदार जागरूकता आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी