
अमरावती, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : अकोला येथील गोरेगाव-पातूर मार्गावर एका व्यक्तीला मारहाण करून त्याची कार आणि मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला अमरावती ग्रामीण पोलिसांच्या नांदगाव पेठ पथकाने धाडसी कारवाई करत जेरबंद केले. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची कार आणि पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील गोरेगाव-पातूर मार्गावर विकास मोकळे यांना चार अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांची मारुती सुझुकी कार (क्रमांक एमएच ३० बीडब्ल्यू ६७९१) आणि दोन मोबाईल फोन जबरीने हिसकावून अमरावतीच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती पोलिसांना सतर्क केले.
माहितीच्या आधारे नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकासह टोलनाक्यावर नाकाबंदी केली. संशयित कार दिसताच पोलिसांनी ती अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने टोलनाका तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका आरोपीने धावत्या कारमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून वाळकी डॅम परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकी शांताराम रोकडे (वय २५, रा. प्रभुत्व नगर, नाशिक) असे आहे. त्याच्याकडून कारसह पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी