
रायगड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। रुद्रवली आदिवासीवाडी येथे अवैध गावठी दारूविक्री विरोधात माणगाव पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी सलग दोन छापे टाकून २ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई बाबुराव शांताराम पवार यांच्या घरामागील पडवीत करण्यात आली. तेथून पाच लिटर गावठी दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा ४० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत संतोष काळूराम वाघमारे आणि निर्मला संतोष वाघमारे यांच्या घरामागील पडवीतून केटीएम ड्यूक दुचाकी, नऊ लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा २ लाख ५० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार निमकर करीत आहेत. अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)