पाथर्डी येथील धर्मसंस्थानच्या शेतजमिनीचा १५ ऑक्टोबरला जाहीर लिलाव
अकोला, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानच्या सुमारे २.९२ हेक्टर शेतजमिनीचा एक वर्षासाठी लागवडीकरिता जाहीर लिलाव १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता संस्थानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. स
पाथर्डी येथील धर्मसंस्थानच्या शेतजमिनीचा १५ ऑक्टोबरला जाहीर लिलाव


अकोला, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानच्या सुमारे २.९२ हेक्टर शेतजमिनीचा एक वर्षासाठी लागवडीकरिता जाहीर लिलाव १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता संस्थानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या देखरेखीखाली ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असून, इच्छुक शेतकरी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षक शुभांगी भोपळे यांनी केले आहे.

सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार हा लिलाव प्रशासकांच्या देखरेखीखाली होणार आहे. गट क्रमांक १९ मधील ०.२९ हेक्टर आर आणि गट क्रमांक २२६ मधील २ हेक्टर ६३ आर अशा एकूण सुमारे २.९२ हेक्टर क्षेत्राचा लिलाव जमिनीच्या सध्याच्या स्थितीत करण्यात येणार आहे. ही जमीन केवळ कृषी लागवडीसाठी वापरण्याची अट घालण्यात आली आहे.

लिलावात सहभागी होण्यासाठी प्रत्येक इच्छुक व्यक्तीला ५०० रुपये सहभाग शुल्क संस्थानच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाथर्डी शाखेतील खाते क्रमांक ३५४५३२६२३८ मध्ये जमा करावे लागेल. शुल्क भरल्याची पावती लिलावाच्या दिवशी सादर करणे बंधनकारक असून, पावती नसल्यास बोली लावता येणार नाही.

लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीस ही जमीन ३१ मार्च २०२७ पर्यंत लागवडीसाठी देण्यात येईल. संबंधित बोलीधारकाला बोलीच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम तत्काळ भरावी लागेल, तर उर्वरित रक्कम आठ दिवसांच्या आत संस्थानच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे.

या जमिनीचा वापर केवळ कृषी उद्देशासाठीच करता येईल. तसेच, शासनाकडून मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान व विम्याची रक्कम संस्थानच्या नावे जमा होईल. त्यावर बोलीधारकाचा कोणताही हक्क राहणार नाही.

इच्छुक शेतकरी व नागरिकांनी निर्धारित वेळेत आणि ठिकाणी उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande