नागपूर : निवडणूक रिंगणातून सोलेंची ‘तोंडी’ माघार
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर पक्षासाठी काम करण्याची दर्शवली तयारी नागपूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.) : विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपसमोर आव्हान उभे करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांनी अ
चंद्रशेखर बावनकुळेंचे स्वागत करताना अनिल सोले, शेजारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपेंद्र कोठेकर


मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर पक्षासाठी काम करण्याची दर्शवली तयारी

नागपूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.) : विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपसमोर आव्हान उभे करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांनी अखेर माघार घेण्याची तोंडी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री सोले यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर सोले यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले होते. उमेदवार निश्चित करताना संबंधित क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार सोले यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांनी सोले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपचे सहसंघटनमंत्री सतीश धोंड आणि विदर्भ संघटन संपर्कप्रमुख डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. सोले यांची नाराजी पक्षाविरोधात नसून पक्षातील निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भविष्यात उमेदवारीसह महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय घेताना अधिकाधिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची भूमिका विचारात घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. अनिल सोले यांची नाराजी दूर झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. सोले हे पक्षासाठी समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचा संताप पक्षाच्या विरोधात नसून पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत होता. त्यांनी परिस्थिती समजून योग्य निर्णय घेतला असून, आता ते सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अनिल सोले भाऊक झाल्याचे दिसून आले. आपण पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यभर काम केले असून, पक्षाला कधीही धोका पोहोचणार नाही, याची नेहमीच काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या मतदारसंघात पक्ष उमेदवार देतो, त्या क्षेत्रातील कार्यकर्ते आणि संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणे आवश्यक आहे, हीच आपली भूमिका होती, असे सोले यांनी स्पष्ट केले. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर होती. त्यामुळे सोले यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी, कागदोपत्री ते निवडणूक रिंगणातच राहणार आहेत. त्यामुळे सोलेंनी तोंडी उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande