
लातूर, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबरपासून राबविण्यात येत असलेल्या सायबर जनजागृती महिन्याच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी, १२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. हा टप्पा २० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत दररोज एका विशेष विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये संवाद सत्रे व चर्चासत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर ऑनलाइन व्यवहार, शिक्षण, आर्थिक देवाणघेवाण तसेच दैनंदिन कामांसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जात आहे.कायदेशीर कारवाईची भीती दाखवून नागरिकांना मानसिक दबावाखाली आणणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे, हा ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीचा एक प्रमुख प्रकार आहे. अशा प्रकरणांत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे.
फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा
कोणतीही कायदेशीर यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून ठेवत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्यांना बळी पडून कोणालाही पैसे पाठवू नयेत. संबंधित व्यक्तीच्या दाव्यांची अधिकृत माध्यमातून पडताळणी करावी. फसवणुकीचा संशय आल्यास किंवा सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता
सायबर जनजागृती अभियानाचा उद्देश केवळ सायबर गुन्ह्यांची माहिती देणे एवढाच नसून, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, संभाव्य फसवणूक वेळीच ओळखण्याची क्षमता विकसित करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावणे हा आहे.विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून मिळालेली माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि समाजातील इतर नागरिकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील आहे. डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगणे आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहणे, हाच या अभियानाचा मुख्य संदेश आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis