
वॉशिंग्टन, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेतील एका न्यायालयाने रविवारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय संदेशाचा प्रचार करण्यासाठी करदात्यांच्या लाखो डॉलरच्या निधीतून तयार केलेल्या दूरचित्रवाणी जाहिराती रद्द करण्याचे आदेश दिले.
न्यूयॉर्कमधील अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जेनिफर एल. रोचॉन यांनी या जाहिरातींवर तात्पुरती स्थगिती आणण्याचा आदेश दिला. तसेच, अद्याप सुरू असलेल्या सर्व जाहिराती रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या आदेशानुसार, पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीत संबंधित प्रतिवादींना वादग्रस्त जाहिराती तयार करणे, त्यांचे नियोजन करणे, प्रसारित करणे, प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे यासाठी कोणताही करार करता येणार नाही. तसेच, अशा जाहिरातींसाठी असलेले विद्यमान करार नूतनीकरण करता येणार नाहीत किंवा त्यांचा कालावधी वाढवता येणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
‘कॉमन कॉज’ या बिगरपक्षीय संस्थेने या जाहिरातींना न्यायालयात आव्हान दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला. करदात्यांच्या पैशांचा बेकायदेशीर वापर करून या जाहिराती तयार करण्यात आल्याचा आरोप संस्थेने केला होता. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा न्यायालयात दाखल केलेल्या दस्तऐवजात न्याय विभागाने तात्पुरती स्थगिती देण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. कथित आक्षेपार्ह जाहिरातींचे प्रसारण दुसऱ्याच दिवशी संपणार असल्याने अशा आदेशाची गरज नसल्याचे विभागाने म्हटले होते.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशांतून २ कोटी डॉलर (२० दशलक्ष डॉलर) मंजूर केले होते. या जाहिरातींसाठी वापरण्यात आलेला निधी हा काँग्रेसने गृह सुरक्षा विभागाला मंजूर केलेल्या १७ कोटी ५० लाख डॉलरच्या (१७५ दशलक्ष डॉलर) निधीचा भाग होता. ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत हा निधी विभागाला देण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode