
स्टॉकहोम, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना २०२६ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी स्टॉकहोम येथे या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांना ‘समष्टि-अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणाचा सूक्ष्म-अर्थशास्त्रीय पाया’ या विषयावरील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले.
रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांच्या संशोधनामुळे सामान्य नागरिकांचा खर्च आणि कंपन्यांचे निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम करतात, हे समजून घेण्यास मदत झाली आहे.अर्थशास्त्रातील या पुरस्काराचे अधिकृत नाव ‘अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेचा अर्थशास्त्रातील पुरस्कार’ असे आहे. यंदाच्या नोबेल पुरस्कार मालिकेतील ही शेवटची घोषणा होती.गेल्या आठवड्यात वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
अर्थशास्त्रातील या पुरस्काराची सुरुवात स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने १९६८ मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ केली. अल्फ्रेड नोबेल हे १९व्या शतकातील प्रसिद्ध स्वीडिश उद्योजक आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि मूळ पाच नोबेल पुरस्कारांची स्थापना केली होती. अर्थशास्त्रातील हा पुरस्कार तांत्रिकदृष्ट्या मूळ नोबेल पुरस्कारांमध्ये समाविष्ट नसला, तरी इतर नोबेल पुरस्कारांप्रमाणेच १० डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदान केला जातो.
यंदाच्या पुरस्काराची एकूण रक्कम १ कोटी २० लाख स्वीडिश क्रोनर (अंदाजे १२ लाख अमेरिकी डॉलर) इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम पुरस्कार विजेत्यांमध्ये विभागून दिली जाणार आहे.दरम्यान, गेल्या वर्षी हा पुरस्कार व्यावसायिक नवकल्पनांवर संशोधन करणाऱ्या तीन अर्थशास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आला होता. नवीन उत्पादने आणि नवकल्पना आर्थिक विकासाला चालना देण्यासोबतच मानवी कल्याणातही कशा प्रकारे भर घालतात, हे त्यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode