
ब्रसेल्स, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।नेपाळ, फ्रान्स आणि ब्राझीलनंतर आता बेल्जियममध्येही ‘जेन झी’ (जनरेशन झेड) तरुण रस्त्यावर उतरले असून, विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. शिक्षणाच्या अर्थसंकल्पातील कपात, वर्गखोल्यांमधील वाढती गर्दी आणि शिक्षकांची कमतरता या मुद्द्यांवरून बेल्जियममध्ये देशव्यापी आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
बेल्जियममधील फ्रेंच भाषिक समुदायात विद्यापीठांचे शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला आहे. प्रस्तावित बदलांनुसार, विद्यापीठाचे शुल्क ८३५ युरोवरून १,१९४ युरो करण्याचा विचार आहे.शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे सांगत, तो केवळ विशेषाधिकार असलेल्या लोकांपुरता मर्यादित ठेवण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. बेल्जियममधील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थानिक शिक्षण सुधारणांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.
आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगड आणि इतर वस्तू फेकल्या. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमकीही झाल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी १३ जण अल्पवयीन आहेत. या आंदोलनाची सुरुवात लीज शहरातून झाली होती. आता हे आंदोलन राजधानी ब्रसेल्सपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देशभरातील शेकडो शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode