
काठमांडू, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।नेपाळमधील मनासलू ट्रेकिंग क्षेत्रात रविवारी पहाटे बूढी गंडकी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे पुन्हा एकदा मोठी हानी झाली आहे. या भीषण आपत्तीत सुमारे ४० घरे, सहा पूल आणि जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत १० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेकिंगचा हंगाम सुरू असल्याने या पुरामुळे १५० हून अधिक परदेशी पर्यटक मार्गात अडकले आहेत. सुदैवाने, वेळेत पाठवण्यात आलेल्या एसएमएस सतर्कतेमुळे अनेक स्थानिक नागरिक सुरक्षित ठिकाणी आणि उंच भागांत स्थलांतरित झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी टळली. सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
लष्कर आणि बचाव पथकांनी आतापर्यंत ४९ जणांची सुखरूप सुटका केली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले असून, सखल भागातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.रविवारी पहाटे चार वाजता बूढी गंडकी नदीला अचानक मोठा पूर आला. पाणी आणि मलब्याचा प्रचंड वेगवान प्रवाह आल्याने परिसरात मोठी हानी झाली. अचानक आलेल्या पुरानंतर आसपासच्या जलप्रवाहांतून मोठे आवाज ऐकू येताच चुमलिंग आणि लोकपा यांसारख्या वस्त्यांमधील नागरिक तसेच तेथे मुक्कामाला असलेले पर्यटक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणांकडे धावले.
मनासलू ट्रेकिंग क्षेत्रात १५० हून अधिक परदेशी पर्यटक अडकले आहेत. भूस्खलनामुळे एखाद्या उपनदीचा प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा साचला असावा. त्यानंतर हा अडथळा दूर झाल्यावर पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह खाली उतरला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आपत्तीत उंगिलुंग नदीजवळ राहणारे पाच नागरिक बेपत्ता आहेत. त्यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय चार ते पाच मेंढपाळही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुराच्या तडाख्यात सुमारे ४० घरे आणि एक प्राथमिक शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अन्य २० ते २२ घरांनाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे सहा पूल वाहून गेल्याने दुर्गम ग्रामीण भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.सल्लेरी येथे उभारण्यात येत असलेल्या ३४१ मेगावॅट क्षमतेच्या बूढी गंडकी जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला तळ आणि तेथील उपकरणेही पुराच्या पाण्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
अरुघाट येथे बूढी गंडकी नदीची पाणीपातळी धोक्याची पाच मीटरची पातळी ओलांडून ८.४ मीटरपर्यंत पोहोचली. पुराच्या प्रवाहात नदीची पाणीपातळी मोजण्यासाठी उभारण्यात आलेले निरीक्षण केंद्रही वाहून गेले. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीची अचूक माहिती मिळवण्यात अडचणी येत आहेत.प्रशासनाने धाडिंग, तनाहुन, चितवन तसेच पूर्व आणि पश्चिम नवलपरासी जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा इशारा दिला आहे.त्रिशूली आणि नारायणी नद्यांच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांनाही नदीकाठापासून दूर राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode