
कोलकाता, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर मंगळवारी सायंकाळी चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी हा गंभीर आरोप केला असून, या प्रकरणी तन्निष्ठा साहा नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
डोला सेन यांच्या दाव्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्या ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते वैश्वानर चट्टोपाध्याय यांच्यासोबत कालीघाट मिलन संघाच्या दुर्गापूजा मंडपाकडे जात होत्या. त्याचवेळी एका महिलेने ममता बॅनर्जी यांना ‘पीसी’ असे संबोधत त्यांच्याकडे धाव घेतली. संबंधित महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आणि तिने ममता बॅनर्जी यांच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डोला सेन यांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधित महिला रस्त्यावर झोपून शिवीगाळ करू लागल्याचेही सेन यांनी सांगितले. महिलेच्या हातात चाकू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, त्या महिलेने आपण सिव्हिक व्हॉलंटियर असल्याचे आणि ममता बॅनर्जी यांची भाची असल्याचे सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेनंतर डोला सेन यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी आपण राज्य पोलिस दलातील असल्याचे सांगून हा परिसर कोलकाता पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने कारवाई करू शकत नसल्याचे म्हंटल्याचा दावा सेन यांनी केला. पोलिस संबंधित महिलेला दूर नेऊन चहा पाजत असल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणी डोला सेन यांनी कालीघाट पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना (ओसी) ई-मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. घटनेनंतर संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत डोला सेन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी