केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा राजीनामा देण्याचा निर्णय
मंत्रिपदासह राज्यसभा सदस्यत्व सोडण्याची दर्शवली इच्छा तामिळनाडूमध्ये भाजप मजबूत करण्यावर भर देण्याची घोषणा नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिपदावरून मुक्त कर
केंद्रीय मंत्री एल. मुरूगन


मंत्रिपदासह राज्यसभा सदस्यत्व सोडण्याची दर्शवली इच्छा

तामिळनाडूमध्ये भाजप मजबूत करण्यावर भर देण्याची घोषणा

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिपदावरून मुक्त करण्याची आणि राज्यसभेचे सदस्यत्व सोडण्याची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागितली आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पूर्ण वेळ देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण पुन्हा तळागाळातील राजकारणात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुरुगन यांनी तामिळनाडूतील पक्षकार्यकर्त्यांसोबत काम करण्याची आणि संघटनेला अधिक बळकट करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील तामिळनाडू दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील जनतेने मोदी यांचे केलेले स्वागत आणि त्यांच्याविषयी व्यक्त केलेला विश्वास याचा आपल्यावर खोलवर परिणाम झाल्याचे नमूद केले. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधानांची असलेली बांधिलकी आणि जनतेचे त्यांच्यावरील प्रेम पाहून तामिळनाडू, भाजप आणि देशासाठी अधिक काम करण्याचा आपला निर्धार आणखी दृढ झाल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सामान्य कुटुंबातून केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास

एल. मुरुगन यांनी आपल्या पत्रात कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख केला आहे. आपण कोणत्याही राजकीय कुटुंबातून आलेलो नसून अत्यंत गरीब कुटुंबात जन्मल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे आई-वडील रोजंदारीवर काम करत होते आणि पशुपालनाशी संबंधित कामही करत होते. आजही ते कोनूर गावात साधे जीवन जगत असल्याचे मुरुगन यांनी नमूद केले.महाकवी सुब्रमण्यम भारती, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (अभाविप) प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. अभाविप आणि भाजपमध्ये सुमारे तीन दशके काम करताना ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्वतः सर्वांत शेवटी’ हे तत्त्व आपण जपल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक कामावर लक्ष

मुरुगन यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर पंतप्रधानांना लिहिलेले पत्र प्रसिद्ध केले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत उभे राहून तामिळनाडूमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करायचे असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे.

एल. मुरुगन यांची 2021 मध्ये प्रथमच राज्यसभेवर निवड झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले.

त्यांच्या राजीनाम्याची विनंती मान्य झाल्यास राज्यसभेतील तामिळनाडूचे त्यांचे सदस्यत्व संपुष्टात येईल. तसेच, मंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती स्वीकारली गेल्यास ते केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडतील.मुरुगन यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये भाजपच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित अधिकृत मंजुरीनंतरच स्पष्ट होईल.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande