‘आंदोलन अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणार’- राहुल गांधी
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (एसआयआर) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी इंडिया आ
राहुल गांधी


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (एसआयआर) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’ केली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारविरोधातील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. हे आंदोलन अंतिम उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आंदोलन थांबणार नाही’; राहुल गांधींचा इशारा

विरोधकांच्या पुढील रणनीतीबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, “रणनीती आधीच सांगितल्यास देशातील नागरिकांचा उत्साह आणि पुढे काय घडणार याबाबतची उत्सुकता कमी होईल. आज नाही तर उद्या, परवा, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षभराने किंवा दोन वर्षांनी; हे आंदोलन थांबणार नाही. ते आपल्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचेल असे राहुल म्हणाले. तसेच आंदोलनाचा पुढील मार्ग नेमका काय असेल, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. पुढील घडामोडींबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता कायम ठेवायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात लढा सुरूच

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. यापुढेही त्याच जोशाने, ताकदीने आणि एकजुटीने सरकारविरोधातील लढा सुरू ठेवणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश आणि भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभारी आहोत. भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आमच्या मनात मोठा आदर आहे. न्यायव्यवस्थेची एक महत्त्वाची भूमिका आहे आणि ती भूमिका ती पार पाडेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, न्यायसंस्थेने आपली भूमिका पार पाडली किंवा नाही, तरी राजकीय विरोध आणि जनतेचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस या लढ्यात विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर वक्तव्य

राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी आली. राहुल गांधी यांच्यासह अन्य दहा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एसआयआर प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून सत्ताधारी पक्ष व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande