
राहुल गांधींच्या निवासस्थानी झाली ‘चाय पे चर्चा’
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी इंडी आघाडीचे नेते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरी समाजातील सदस्यांसाठी ‘हाय टी’ बैठकीचे आयोजन केले. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, हे आंदोलन एका निश्चित उद्देशाने सुरू आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. सामान्य नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ज्ञानेश कुमार हे लोकशाहीला नुकसान पोहोचवत आहेत. आंदोलन पुढे नेण्यासाठी जंतर-मंतरवरही संघर्ष केला जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळवणे हे आमचे ध्येय आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विरोधकांची एकजूट; आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधक एकजुटीने आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले. आम्ही पूर्ण ताकदीने एकत्र आहोत आणि आंदोलनही त्याच ताकदीने सुरू राहील, असे त्या म्हणाल्या.ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नागरी समाजाचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. आगामी काळात शेतकरी आणि कामगार संघटनाही या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवर (एसआयआर) आक्षेप घेत ही प्रक्रिया मतचोरीसाठी असल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) अध्यक्षा नेहा बोरा यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
बैठकीला अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थितीराहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, खासदार शशी थरूर, सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.इंडिया आघाडीकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि मनोज झा, समाजवादी पक्षाचे खासदार व नेते, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एम. ए. बेबी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनीही सहभाग घेतला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत माहिती दिली. आगामी काळात हे आंदोलन कसे पुढे न्यायचे, यावर चर्चा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही जनतेचा आवाज योग्य पद्धतीने उठवून देशातील लोकशाहीचे संरक्षण केले पाहिजे, असे खेडा म्हणाले.काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून एसआयआर प्रक्रियेवर सातत्याने आक्षेप घेतला जात आहे. ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका केली. राहुल गांधी यांनी दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेसच्या वारंवार होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेससाठी ‘रेड फ्लॅग’ अर्थात धोक्याचा इशारा असे संबोधले.निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी