
विविध मालमत्ता वर्गांतील आर्बिट्राज संधींवर लक्ष
आगामी 26 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.) : विविध मालमत्ता वर्गांतील किमतींच्या तफावतीतून निर्माण होणाऱ्या आर्बिट्राज संधींचा लाभ घेण्याच्या उद्देशाने समिट एसआयएफने ‘समिट ऍक्टिव्ह ऍसेट ऍलोकेटर लाँग-शॉर्ट फंड’ लाँच करण्याची घोषणा केली आहे. इक्विटी, डेट, डेरिव्हेटिव्ह्ज, इनव्हिट्स आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज अशा विविध गुंतवणूक साधनांमध्ये गतिशील पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या या फंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पर्यायी गुंतवणूक धोरण उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या फंडचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) 12 ऑक्टोबर रोजी खुला झाला असून 16 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.
पारंपरिक आर्बिट्राज धोरणे प्रामुख्याने कॅश आणि फ्युचर्स बाजारातील किंमतींच्या फरकातून निर्माण होणाऱ्या संधींवर केंद्रित असतात. मात्र, आर्थिक बाजारपेठांचा विस्तार आणि विविध गुंतवणूक साधनांची वाढती उपलब्धता यामुळे वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांतही अशा संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर समिट एसआयएफने नव्या फंडची रचना केली असून, एकाच पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारच्या आर्बिट्राज धोरणांचा समावेश करण्यावर भर दिला आहे. या फंडच्या गुंतवणूक धोरणाचा मुख्य आधार कोअर आर्बिट्राज असेल. त्यासोबत सिंथेटिक आर्बिट्राज, इंडेक्स आर्बिट्राज, कमोडिटी आर्बिट्राज आणि बाजारातील विशेष परिस्थितींमध्ये उपलब्ध होणाऱ्या संधींचाही विचार केला जाणार आहे. बाजारातील स्प्रेड्सचा लाभ घेताना बाजाराच्या दिशेवर अवलंबून असलेली जोखीम मर्यादित ठेवण्याचा या धोरणाचा प्रयत्न असेल.
नियामक तरतुदींनुसार परवानगी असलेल्या साधनांमध्ये डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून मर्यादित शॉर्ट पोझिशन्स घेण्याची तरतूदही या फंडमध्ये आहे.बाजार वर जाणार की खाली, याचा अचूक अंदाज बांधण्याऐवजी विविध आर्थिक साधनांच्या किमतींमधील तफावतीतून निर्माण होणाऱ्या संधींचा शोध घेणे, हा या फंडच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीसाठी पर्यायी धोरण शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना विविध आर्बिट्राज संधींच्या माध्यमातून वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे.या गुंतवणूक धोरणाचे व्यवस्थापन फंड मॅनेजर दीपक गुप्ता करणार आहेत. फंडचा बेंचमार्क 40 टक्के निफ्टी 500 टीआरआय, 40 टक्के क्रिसिल शॉर्ट टर्म बाँड फंड इंडेक्स आणि 20 टक्के आयकॉमडेक्स कंपोझिट इंडेक्स यांच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे.
फंडच्या लाँचप्रसंगी बोलताना दीपक गुप्ता म्हणाले की, आर्बिट्राजकडे सामान्यतः कॅश-फ्युचर्स स्प्रेड्सच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र, विविध बाजारपेठा, आर्थिक साधने आणि बाजारातील परिस्थितींमध्ये किमतींच्या तफावतीतून अनेक संधी निर्माण होऊ शकतात. एसआयएफची चौकट आम्हाला पारंपरिक आर्बिट्राजसोबत सिंथेटिक फ्युचर्स, इंडेक्स, कमोडिटी आणि विशेष परिस्थितींमधील आर्बिट्राज संधी शोधण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या फंडच्या माध्यमातून बाजाराच्या दिशेबाबतच्या अंदाजांवर अवलंबून न राहता संभाव्य परताव्याच्या संधींचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्यावर आमचा भर आहे. कोअर आर्बिट्राज हा पोर्टफोलिओचा पाया असेल, तर आकर्षक स्प्रेड्स उपलब्ध असलेल्या ठिकाणी पूरक धोरणांचा निवडक वापर केला जाईल. त्याचबरोबर जोखीम व्यवस्थापनातील शिस्तही महत्त्वाची असेल. अवाजवी किंवा असमतोल जोखीम न स्वीकारता अतिरिक्त परताव्याच्या संधी शोधणे, हा आमचा उद्देश आहे.
गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या अटी
या फंडच्या एनएफओदरम्यान सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणुकीची रक्कम 10 लाख रुपये असून, त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक एक लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यासाठी अर्जाची किमान रक्कम एक हजार रुपये असून, त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. तथापि, समिट एसआयएफच्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये मिळून किमान 10 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा राखण्याची अट लागू असेल.लागू नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) नुसार फंडमध्ये दररोज सबस्क्रिप्शन करता येईल. रिडेम्पशनची सुविधा आठवड्यातून दोनदा, म्हणजे सोमवार आणि बुधवार उपलब्ध असेल. या दिवशी सुट्टी असल्यास त्यानंतरचा पुढील कामकाजाचा दिवस ग्राह्य धरला जाईल.
युनिट्स खरेदी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत किंवा 30 व्या दिवशी रिडेम्पशन अथवा स्विच-आउट केल्यास 0.50 टक्के एक्झिट लोड आकारला जाईल. 30 दिवसांनंतर आणि 60 दिवसांपर्यंत रिडेम्पशन किंवा स्विच-आउट केल्यास 0.25 टक्के एक्झिट लोड लागू असेल. तर 60 दिवसांनंतर रिडेम्पशन किंवा स्विच-आउट केल्यास कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही. विविध मालमत्ता वर्गांतील आर्बिट्राज संधींचा एकत्रित विचार करून गुंतवणुकीचा पर्यायी दृष्टिकोन उपलब्ध करून देणे, हा समिट एसआयएफच्या नव्या फंडमागील मुख्य उद्देश आहे. मात्र, गुंतवणुकीपूर्वी संबंधित योजनेची कागदपत्रे, पात्रतेच्या अटी, शुल्क आणि गुंतवणुकीतील जोखीम यांचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. आर्बिट्राज धोरणामुळे जोखीम पूर्णपणे नाहीशी होत नाही आणि परताव्याची हमीही मिळत नाही.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis