
सायबर सुरक्षा सल्लागाराची जबाबदारी सांभाळणार
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यांपासून सुरक्षितता देण्याचा कंपनीचा प्रयत्न
नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म ट्विनकॅफेने राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ, लेखक आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील जाणकार अमित दुबे यांची मेंटर तसेच सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
डिजिटल ओळख, डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते धोके लक्षात घेऊन प्लॅटफॉर्मची सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडा येथे आयोजित माध्यम संवाद कार्यक्रमात अमित दुबे यांच्या डिजिटल ट्विनचेही औपचारिक अनावरण करण्यात आले. हे डिजिटल ट्विन नागरिकांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल गुन्ह्यांशी संबंधित समस्यांवर मार्गदर्शन करणार आहे. नोएडा येथील सेक्टर ९८ मधील ट्विनकॅफेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला अमित दुबे, ट्विनकॅफेचे व्यवस्थापकीय संचालक संदीश गोयल तसेच संस्थापक टीमचे सदस्य आणि ब्रँड एव्हँजेलिस्ट तरुण सिंघल उपस्थित होते.ट्विनकॅफे हे यापूर्वी आस्कसिला या नावाने ओळखले जात होते.
पुनर्ब्रँडिंगनंतर कंपनी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लेखक, तज्ज्ञ आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे ज्ञान, व्यक्तिमत्त्व आणि अनुभव यांच्या आधारे व्यापक स्तरावर लोकांशी जोडण्याचे काम करत आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमित दुबे यांचे डिजिटल ट्विन आता प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित झाले असून, ते वापरकर्त्यांना ऑनलाइन धोक्यांचा सामना करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. एआयच्या मदतीने होणारे सायबर हल्ले आणि डीपफेकच्या घटनांमध्ये वाढ होत असताना डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरक्षितता आणि विश्वासार्हता ही सर्वोच्च प्राथमिकता बनल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
अमित दुबे म्हणाले की, प्रशिक्षण, दूरचित्रवाणी, रेडिओ आणि लेखनाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केला आहे. मात्र, भारतात दर्जेदार आणि विश्वासार्ह सायबर सुरक्षा मार्गदर्शनाची गरज ही एका व्यक्तीच्या आवाक्यापलीकडची आहे.
ते म्हणाले की, त्यांच्या डिजिटल ट्विनमुळे छोट्या शहरातील विद्यार्थी, स्वतःचा व्यवसाय सुरू करणारा उद्योजक, नोकरदार व्यक्ती किंवा ऑनलाइन फसवणुकीबाबत चिंतित असलेले ज्येष्ठ नागरिक यांना कोणत्याही वेळी प्रत्यक्ष तपासाच्या अनुभवावर आधारित सल्ला मिळू शकेल. ट्विनकॅफेमध्ये विश्वास हा प्रत्येक गोष्टीचा पाया असून, याच विश्वासाचे संरक्षण करण्यासाठी आपण या व्यासपीठाशी जोडले गेल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्विनकॅफेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष गर्ग म्हणाले की, डिजिटल ट्विनची उपयुक्तता ही लोकांचा त्यावरील विश्वास किती आहे, यावर अवलंबून असते. देशातील नामवंत व्यक्तींचे ज्ञान आणि अनुभव या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देताना प्रत्येक डिजिटल ट्विन आणि त्याद्वारे होणाऱ्या प्रत्येक संवादाची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. अमित दुबे यांचा व्यापक अनुभव व्यक्ती आणि संस्थांना विश्वासार्ह वाटेल असे व्यासपीठ विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कंपनीच्या संस्थापक टीमचे सदस्य, वरिष्ठ ग्रोथ लीडर आणि ब्रँड एव्हँजेलिस्ट तरुण सिंघल म्हणाले की, सायबर धोके कार्यालयीन वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे योग्य सल्लाही ठरावीक वेळेपुरता मर्यादित राहता कामा नये. ट्विनकॅफेवरील अमित दुबे यांचे डिजिटल ट्विन विद्यार्थी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित सायबर सुरक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देईल. तज्ज्ञांचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीच्या मते, ट्विनकॅफेचे उद्दिष्ट केवळ एआयवर आधारित व्यासपीठ उभारणे एवढेच नसून, ज्ञान, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व यांना काळाच्या आणि भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे नेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणारे डिजिटल माध्यम विकसित करणे हे आहे. या विस्तारासोबतच सुरक्षितता आणि विश्वासार्हता या मूलभूत बाबींना प्राधान्य दिले जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
ट्विनकॅफेविषयी
ट्विनकॅफे हे विवेन एआयने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल ट्विन व्यासपीठ आहे. या माध्यमातून व्यक्तींना स्वतःचा आवाज, व्यक्तिमत्त्व, ज्ञान आणि तज्ज्ञता यांवर आधारित एआय आवृत्ती तयार करून मोठ्या प्रमाणावर लोकांशी संवाद साधता येतो. तंत्रज्ञान उद्योजक आशुतोष गर्ग यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीला खोसला व्हेंचर्स आणि फाउंडेशन कॅपिटल यांच्याकडून प्रारंभिक टप्प्यात ३.५ कोटी अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी