
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मागील सत्रातील घसरणीतून दमदार पुनरागमन केले. एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या सप्टेंबर तिमाहीतील मजबूत आर्थिक निकालांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. तसेच, भारतीय रुपयाच्या मूल्यात झालेली सुधारणा आणि बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. बाजारातील अस्थिरता दर्शविणारा इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकही आठ टक्क्यांहून अधिक घसरला.
मंगळवारी निफ्टी ५० निर्देशांकाची सुरुवात २२,३६४.१५ अंकांवर किरकोळ वाढीसह झाली. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार होऊन निर्देशांक २२,२८८.४५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बाजाराने वेगाने पुनरागमन केले. दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात तेजीला आणखी बळ मिळाले. निफ्टीने २२,७१९.२५ अंकांची उच्चांकी पातळी गाठली आणि अखेर ३5८.6० अंकांच्या म्हणजेच १.60 टक्क्यांच्या वाढीसह २२,७२1.9५ अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली. सेन्सेक्स १,१०९.१० अंकांनी म्हणजेच सुमारे १.५४ टक्क्यांनी वाढून ७३,०३३.७८ अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील या प्रचंड तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत केवळ एका दिवसात ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलटीसीजी कर आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सवर केलेल्या टिप्पणीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला, परिणामी शेअर बाजारात तेजी आली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील खरेदी ही बाजारातील तेजीची प्रमुख कारण ठरली. एचसीएल टेक्नॉलॉजीजने सप्टेंबर तिमाहीत वार्षिक तुलनेत २१.२ टक्के वाढ नोंदवत ५,१३२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवला. कंपनीच्या कार्यकारी नफ्यात सुधारणा झाली असून, नवीन व्यावसायिक करारांमुळेही कामगिरीला बळ मिळाले. कंपनीच्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसायाचा वार्षिकीकृत महसूल मागील तिमाहीतील १७१ दशलक्ष डॉलरवरून वाढून २१९ दशलक्ष डॉलर झाला.
या निकालांनंतर एचसीएल टेक्नॉलॉजीजचा शेअर ८.४२ टक्क्यांहून अधिक वधारला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसच्या शेअरमध्येही सुमारे ६.७९ टक्क्यांची वाढ झाली. इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदी झाली. परिणामी, निफ्टी आयटी निर्देशांक ५.२२ टक्क्यांनी वधारून सर्वाधिक कामगिरी करणारा क्षेत्रीय निर्देशांक ठरला.
भारतीय रुपयाच्या मूल्यात झालेल्या सुधारणेचाही बाजाराला आधार मिळाला. मंगळवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सुमारे ९५.२७ रुपयांवर मजबूत झाला. रुपयातील सुधारणेमुळे आयातीचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर असल्याने भारताच्या आयात खर्चाबाबत चिंता कायम आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचल्याने महागाई आणि व्याजदरांच्या पुढील दिशेकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रिअॅल्टी २.४६ टक्क्यांनी वाढला. निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकांतही एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, निफ्टी फार्मा निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. व्यापक बाजारात निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.०६ टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.११ टक्क्यांनी वाढला.
वैयक्तिक शेअर्समध्ये बंधन बँकेचा शेअर अबू धाबीस्थित निधीकडून प्रवर्तक कंपनीत संभाव्य गुंतवणुकीच्या वृत्तानंतर सुमारे ९.२१ टक्क्यांनी वधारला. निफ्टीच्या वाढीत इन्फोसिस, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँक, इटर्नल आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समुळे निर्देशांकाच्या वाढीला काही प्रमाणात मर्यादा आली.
राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार झालेल्या एकूण ३,६४४ शेअर्सपैकी २,१२८ शेअर्स वधारले, तर १,४१८ शेअर्स घसरले. ९८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. एकूण ७१ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक, तर १५९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांक नोंदवला. याशिवाय, १०१ शेअर्स अप्पर सर्किटमध्ये, तर १०७ शेअर्स लोअर सर्किटमध्ये बंद झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule