
अमरावती, १४ ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी विद्यापीठाने विशेष कृती समिती स्थापन केली आहे. या सवलतीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांमार्फत अर्ज मागविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारीही महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाची कार्यवाही
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ स्तरावर कृती समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विशेष समिती गठित केली आहे.
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्यरत राहणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्जांची प्रक्रिया, पडताळणी आणि आवश्यक कार्यवाहीवर समिती लक्ष ठेवणार आहे.
कृती समितीत विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा समावेश
या कृती समितीच्या अध्यक्षपदी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
अर्ज संबंधित महाविद्यालयांमार्फत करावा लागणार
परीक्षा शुल्कमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित महाविद्यालयात विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. महाविद्यालयांकडून अर्जांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पात्र अर्ज शिफारशीसह विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांसाठी शुल्कमाफी
ही सवलत शैक्षणिक सत्रातील हिवाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही परीक्षांसाठी लागू असणार आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षेचे शुल्क यापूर्वीच भरले आहे, त्यांना संबंधित शुल्क नंतर परत करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिली.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार असून, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी