
यवतमाळ, 26 ऑक्टोबर (हिं.स.)
गुप्तधनाच्या शोधासाठी मानकी गावालगतच्या खेकडी (रिठ) हनुमान मंदिर परिसरात खड्डा खोदल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास उघडकीस आला. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. वणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनिल मारोती बावणे (वय ५६) आणि मानकी येथील रामदास निळकंठ दर्वे (वय ४४) अशी ग्रामस्थांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. विठ्ठल अतकरे (वय ३०), गणेश नागपुरे (वय २८), वासुदेव (वय ५०) तिघेही रा. घुग्घुस, रंजना कामटकर (वय ३५) रा. मैल गड्डा, शास्त्रीनगर, वणी, आणि अंदाजे ३५ वर्षांची एक अनोळखी महिला हे पाच जण फरार झाले आहेत. शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता पाच पुरुष, दोन महिला मंदिराजवळ पूजा-पाठ करून टिकास आणि फावड्याच्या साहायाने खड्डा खोदत असल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांना पाहताच पाच जणांनी पळ काढला. मात्र, वणीतील अनिल मारोती बावणे (वय ५६) आणि मानकी येथील रामदास निळकंठ दर्वे (वय ४४) यांना ग्रामस्थांनी पकडले. माहिती मिळताच पोलिस पाटील आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी वणी पोलिसांना कळविले. सहायक पोलिस निरीक्षक सय्यद साजिद यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य, पाच लाडू, पाच चिकन सुपाऱ्या, तसेच टिकास आणि फावडे जप्त करण्यात आले.
हे पाच आरोपी झाले फरार या प्रकरणातील विठ्ठल अतकरे वय ३०, गणेश नागपुरे वय २८, वासुदेव वय ५०, तिघेही रा. घुग्घुस, रंजना कामटकर वय ३५, रा. मैल गड्डा, शास्त्रीनगर, वणी तसेच अंदाजे ३५ वर्षांची एक अनोळखी महिला हे पाच जण फरार झाले आहे. वणी पोलिस सदर आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी