भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी तळेगाव ठाकूरमध्ये सांस्कृतिक जल्लोष
अमरावती, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : विदर्भाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेला भुलाबाईचा उत्सव तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त महिला आणि लहान मुलींनी एकत्र येत पारंपरिक भुलाबाईची गाणी गायली, टि
भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी तळेगाव ठाकूरमध्ये सांस्कृतिक जल्लोष


अमरावती, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : विदर्भाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेला भुलाबाईचा उत्सव तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त महिला आणि लहान मुलींनी एकत्र येत पारंपरिक भुलाबाईची गाणी गायली, टिपऱ्यांचे खेळ खेळले तसेच भातुकली ओळखण्याच्या खेळातून जुन्या परंपरांना उजाळा दिला. लहान मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

विदर्भातील ग्रामीण भागात भुलाबाईचा सण श्रद्धा आणि आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी भुलाबाईची स्थापना केली जाते, तर कोजागिरी पौर्णिमेला या उत्सवाला विशेष महत्त्व असते. महिला आणि मुली घरोघरी भुलाबाईची स्थापना करून पूजा-अर्चा करतात. सायंकाळी एकत्र जमून पारंपरिक गाणी गायली जातात, विविध खेळ खेळले जातात आणि खिरापतीचा प्रसाद वाटला जातो.

पारंपरिक गीतांनी उत्सवात भरली रंगत

भुलाबाईच्या उत्सवातील पारंपरिक लोकगीते हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘एका लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू’, ‘पहिली गं भुलाबाई’ आणि ‘देवा देवा सहदेव, सहा दिला खंडोबा’ यांसारख्या पारंपरिक गीतांचे गायन करण्यात आले. या गीतांमधून ग्रामीण जीवनशैली, कौटुंबिक नातेसंबंध आणि लोकपरंपरांचे दर्शन घडते. टिपऱ्यांचे खेळ आणि भातुकली ओळखण्याच्या उपक्रमांमुळे उत्सवात विशेष रंगत आली.

नव्या पिढीपर्यंत पोहोचतोय सांस्कृतिक वारसा

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक ठिकाणी पारंपरिक सण साजरे करण्याच्या प्रथा कमी होत असताना, तळेगाव ठाकूर येथे सामूहिक सहभागातून ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ महिलांकडून पारंपरिक गाणी आणि खेळ शिकण्याची संधी लहान मुलींना मिळाली. त्यामुळे विदर्भाच्या लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.भुलाबाईचा उत्सव उत्साहात साजरा करून तळेगाव ठाकूर येथील महिलांनी आणि मुलींनी पारंपरिक लोककला, लोकगीते आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande