
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी चौकशी समिती आणि व्ही. राधा समिती नियुक्त करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून दरवर्षी जास्तीत जास्त पदांची भरती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षा, ऊस गाळप हंगाम, शेतकरी मदत आणि वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आगाऊ मदत देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्यामुळे पुण्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
एमपीएससी परीक्षांमधील पारदर्शकता, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा वाढवणे या मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सरकारची भूमिका मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु