
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रिय होऊन प्रचाराला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी पुण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. मतदारांशी सातत्याने संवाद साधून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि मतदानासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु