प्रलंबित संचमान्यता तातडीने निकाली काढा - प्रा. मारुती सूर्यवंशी
लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रलंबित संचमान्यता तातडीने निकाली काढून संबंधित महाविद्यालयांना संचमान्यता आदेश देण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे लातूर जिल्ह
निवेदन


लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रलंबित संचमान्यता तातडीने निकाली काढून संबंधित महाविद्यालयांना संचमान्यता आदेश देण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. मारुती सूर्यवंशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण उपसंचालक दीपक चवणे व सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले यांच्याकडे निवेदन सादर केले.

लातूर, नांदेड व धाराशिव विभागातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनेक संचमान्यता अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

संचमान्यता प्रक्रियेदरम्यान संबंधित सहाय्यक शिक्षण संचालक, उपनिरीक्षक, पंचायत समितीतील बीआरसी, कामकाज पाहणाऱ्या साधन व्यक्ती तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य व लिपिक यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करून प्रलंबित संचमान्यतांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि संबंधित महाविद्यालयांना संचमान्यता आदेश देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी प्रा. सूर्यवंशी यांनी केली.

शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संचमान्यतेचे प्रश्न विहित वेळेत निकाली निघणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित संचमान्यता तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

यावेळी प्रा. गिरीधर तेलंगे, प्रा. दीपक रणदिवे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्रा. राम जोशी, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. वैजनाथ जाधव, प्रा. विरेश स्वामी आदी प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande