
लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतः पाच क्षयरुग्णांना दत्तक घेत त्यांच्या पुढील सहा महिन्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच, जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, औद्योगिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही क्षयरुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरवर्षी अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे निदान
लातूर जिल्ह्यात दरवर्षी अडीच हजारांपेक्षा अधिक क्षयरुग्णांचे निदान होते. आरोग्य विभागामार्फत या रुग्णांना मोफत निदान आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, औषधोपचारांसोबतच रुग्णांना पोषक व प्रथिनयुक्त आहार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य पोषणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि रुग्णांना बरे होण्यास मदत होते.ही गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पाच क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासंदर्भात त्यांनी पोषण आहाराच्या संचांचे वितरण जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांच्याकडे केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांचाही पुढाकार
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनीदेखील क्षयरुग्णाला दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेला हा पुढाकार क्षयरुग्णांना पोषणासाठी मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे.
क्षयरुग्णांना औषधोपचारांसोबत पुरेसा पोषण आहार मिळावा, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, खासगी संस्था, उच्चपदस्थ अधिकारी, औद्योगिक संस्था, साखर कारखाने आणि इतर सामाजिक घटकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. एखाद्या रुग्णाला दिलेली छोटीशी मदतही त्याच्या आरोग्यासाठी मोठा आधार ठरू शकते.लातूर जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
‘टीबी मुक्त भारत’ पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
क्षयरुग्णांना पोषण आहार संचाच्या स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ‘टीबी मुक्त भारत’ या संकेतस्थळावर किंवा ॲपवर नोंदणी करून आपले योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.क्षयरुग्णांना पोषणाचा आधार मिळवून देत त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि लातूर जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेला बळ देण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis