सौदीतील अरामकोच्या प्रशासकीय इमारतीवर हुतींचा हल्ला
रियाध, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोच्या एका प्रशासकीय इमारतीला क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर इमारतीला आग लागली. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत
सौदीतील अरामकोच्या प्रशासकीय इमारतीवर हुतींचा हल्ला


रियाध, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोच्या एका प्रशासकीय इमारतीला क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर इमारतीला आग लागली. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. इराणसमर्थित हुती बंडखोर आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यात मंगळवारी रात्री हल्ले झाल्यानंतर ही घटना घडली. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाला यामुळे आणखी तीव्र वळण मिळाल्याचे मानले जात आहे. सौदी अरेबिया आणि इराणसमर्थित हुती बंडखोरांमधील तणावही वाढला आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेली इमारत सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतात आहे. हा प्रांत देशातील प्रमुख तेल उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

यापूर्वी सौदी अरेबियाने राजधानी रियाध आणि पूर्व प्रांताच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने दावा केला की,रियाध, वादी अल-दवासिर आणि इतर भागांच्या दिशेने डागण्यात आलेली अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली. रियाधमधील रहिवाशांनीही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती दिली.

यापूर्वी मंगळवारी सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनची राजधानी सना येथील हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांवर हवाई हल्ले केले. हुतींच्या नियंत्रणाखालील माध्यमे आणि स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, शहराच्या पश्चिमेकडील सुबाहा इंधन केंद्राला लक्ष्य केल्यानंतर काही तासांनी सनामध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले.

सौदी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी आरोप केला की, हुती बंडखोर येमेन ऑइल कंपनीच्या सुविधांचा आणि भूमिगत इंधन साठवण केंद्रांचा वापर क्षेपणास्त्रे व ड्रोन साठवण्यासाठी करत होते. हल्ल्यापूर्वी आघाडीने स्थानिक नागरिकांना संबंधित ठिकाण आणि आसपासची साठवण क्षेत्रे रिकामी करण्याचा इशारा दिला होता. येमेन ऑइल कंपनीने मात्र दावा केला की, तिच्या इंधन साठवण सुविधांमध्ये कोणताही साठा नव्हता. त्यामुळे या हल्ल्याचा तेलसाठ्यावर किंवा स्थानिक नागरिकांना होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. तथापि, इंधनाची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी इशारा दिला की, सनावर सौदी अरेबियाकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला रियाधमध्ये कठोर आणि वेदनादायक प्रत्युत्तर दिले जाईल.दरम्यान, संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन काही विमान कंपन्यांनी आपली विमाने रियाधहून अन्य विमानतळांवर हलवली. संघर्षाच्या परिस्थितीत विमान वाहतुकीची सुरक्षितता आणि विम्याशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन अशी पावले उचलली जातात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande