सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान ठामपणे पाठीशी उभा; शहबाज शरीफ यांचा पुनरुच्चार
इस्लामाबाद , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियावर हूतींचे हल्ले सुरू असतानाच पाकिस्तानकडून एक महत्त्वपूर्ण विधान करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान ठामपणे त्याच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले
सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान ठामपणे पाठीशी उभा; शहबाज शरीफ यांचा पुनरुच्चार


इस्लामाबाद , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियावर हूतींचे हल्ले सुरू असतानाच पाकिस्तानकडून एक महत्त्वपूर्ण विधान करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान ठामपणे त्याच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले आहे. यासह त्यांनी सौदी अरेबियाचे प्रादेशिक सार्वभौमत्व आणि सुरक्षेचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.मक्का संयुक्त संरक्षण कराराचे नवनियुक्त सरचिटणीस, निवृत्त लेफ्टनंट जनरल नौमान महमूद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शरीफ यांनी हे विधान केले.

नौमान महमूद यांनी पंतप्रधान कार्यालयात शहबाज शरीफ यांची भेट घेतली. सप्टेंबरमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्किये यांच्यातील युतीचे पहिले सरचिटणीस म्हणून महमूद यांची नियुक्ती करण्यात आली होती. या युतीचा आधार मक्का संयुक्त संरक्षण करार असून, त्यावर तिन्ही देशांनी ७ ऑगस्ट रोजी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार, तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.

पाकिस्तान माध्यमांच्या वृत्तानुसार, महमूद यांनी शरीफ यांना या कराराअंतर्गत संरक्षण आणि सामरिक सहकार्याला चालना देण्यासाठी आखण्यात आलेल्या रणनीतीची माहिती दिली. शरीफ यांनी या कराराचे वर्णन ‘प्रदेशातील शांतता, एकता आणि स्थैर्यासाठीचा ऐतिहासिक टप्पा’ असे केले. तसेच, महमूद यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौदी अरेबियामध्ये हूती बंडखोरांनी हल्ले तीव्र केले असतानाच ही बैठक झाली आहे. हूतींकडून पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. वृत्तानुसार, इराणसमर्थित हूती बंडखोरांनी या महिन्यात रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अबहा विमानतळासह अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांमुळे विमानसेवांवर परिणाम झाला असून, जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयानुसार, देशाच्या पूर्व प्रांतातील अरामकोच्या एका प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासकीय इमारतीला आग लागली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.मंगळवारी रात्री हूती बंडखोर आणि सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यात झालेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदी अरेबियासोबतचे संरक्षणविषयक आणि सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande