
इस्लामाबाद , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मंगळवारी आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच गोळीबार केला. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेतृत्वाखालील प्रांतीय सरकार निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही चकमक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पेशावरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारा परिसरात सर्वाधिक हिंसाचार झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणे या आरोपांखाली त्यांच्याविरोधात दहशतवाद आणि तोडफोडीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलकांनी बारामधील राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरणाच्या (नाद्रा) केंद्राला आग लावली. मात्र, पीटीआयचे माहिती सचिव इकराम खताना यांनी हा दावा फेटाळत अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचे आणि परिसरातील कार्यालयांवर हल्ला केल्याचे सांगितले.
पाकिस्तान सरकारने बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये झालेली वाढ यांचा हवाला देत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सरकार निलंबित केले आहे.राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या संविधानातील अनुच्छेद २३२(१) आणि २३४(१) अंतर्गत ही घोषणा जारी केली. दहशतवादी घटनांच्या असामान्य वाढीमुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे या घोषणेत नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode