
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : सरकारने दिवाळी आधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना ॲडवान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सरकारच्या या निर्णयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना केवळ अग्रीम मदत देऊन चालणार नाही, तर त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणतात की,शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना केवळ अग्रीम मदत देऊन चालणार नाही, तर त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात घेतलेले पीककर्ज सरसकट माफ करण्यात यावे. तसेच, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी