
लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर शहरातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. नळ जोडणी, नळांच्या तोट्या आणि पाणीगळती दुरुस्तीची सर्व कामे २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांना सूचना
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करावा, पाणी रस्त्यावर किंवा गटारात वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच प्रत्येक नळाला आवश्यक तोटी बसवून घ्यावी.
अनधिकृत नळ जोडणी असलेल्या नागरिकांनी ती तातडीने अधिकृत करून घ्यावी. नळ जोडणीतील गळती, तोट्यांमधून होणारी पाण्याची गळती आणि इतर त्रुटी निर्धारित मुदतीत दुरुस्त कराव्यात, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
या गोष्टींना सक्त मनाई
महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी काही बाबींवर सक्त मनाई केली आहे.
- मुख्य जलवाहिनीवरून थेट पाणी उपसण्यासाठी विद्युत मोटार पंप बसविणे.
- पिण्याच्या पाण्याने रस्ते, वाहने किंवा घरासमोरील रस्ता धुणे.
- महानगरपालिकेच्या जलवाहिनीशी अनधिकृत छेडछाड करणे.
- सार्वजनिक विंधन विहिरींवरील विद्युत उपकरणांना हात लावणे.
या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
पाण्याचा अपव्यय केल्यास २५ हजारांपर्यंत दंड
पाण्याचा अपव्यय किंवा निष्काळजीपणा आढळल्यास चूक कितव्यांदा केली आहे, त्यानुसार दंड आकारण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
- पहिली चूक : ५ हजार रुपये दंड.
- दुसरी चूक : १० हजार रुपये दंड.
- तिसरी चूक : २५ हजार रुपये दंड.
याशिवाय, संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असे महानगरपालिकेच्या सूचनेत नमूद आहे.
पाणी वाचविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
शहरातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी २१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी नळ जोडणी, तोट्या आणि गळती दुरुस्तीची कामे पूर्ण करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis