लातूरात सिद्धी शुगरच्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पाण्याचे महत्त्व ओळखा; प्रत्येक शेतकऱ्याने जलतारा व जलपुनर्भरण प्रकल्प राबवावेत! - संचालक अविनाश जाधव लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। : यंदा अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले
अविनाश जाधव


पाण्याचे महत्त्व ओळखा; प्रत्येक शेतकऱ्याने जलतारा व जलपुनर्भरण प्रकल्प राबवावेत! - संचालक अविनाश जाधव

लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।

: यंदा अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक पिकांचे नुकसान झाल्याने ऊस हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराचे पीक ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे थेंब न् थेंब नियोजन करून ऊस पीक जगवावे. खोडवा असो वा निडवा, ऊस मोडीत काढू नये. तसेच पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने जलतारा व जलपुनर्भरणासारखे प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे, असे आवाहन सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी केले.

सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता विनायक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. यावेळी जाधव यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि ऊस पिकाच्या योग्य नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.

ऊस पिकाचे योग्य नियोजन करा!

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेती क्षेत्रावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी खचून न जाता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. ऊस पिकाला आवश्यक तेवढे पाणी देऊन पीक जगविण्यास प्राधान्य द्यावे. आगामी काळात उसाला चांगला दर मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खोडवा आणि निडवा ऊस मोडू नये, असे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.

ऊस गाळपासाठी पाठविल्यानंतर लगेचच उसाच्या बुडख्यांची छाटणी करावी. ऊस पाचट जाळण्याऐवजी त्याचा शेतात आच्छादनासाठी वापर करावा. यामुळे पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होईल. त्याचबरोबर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलतारा आणि जलपुनर्भरण प्रकल्प प्रत्येक शेतकऱ्याने राबवावेत. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना व्यापक प्रमाणात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत गळीत हंगामाचा प्रारंभ

या कार्यक्रमाचा शुभारंभ अकोला येथील सेव्हन स्टार डिस्टीलरीचे चेअरमन राजेंद्र जयस्वाल, कारखान्याचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव आणि कारखान्याचे सभासद तुकाराम साहेबराव जाधव व त्यांच्या पत्नी (रा. नागठाणा), तसेच बालाजी किशन कासले व त्यांच्या पत्नी (रा. उजना, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, वर्क्स मॅनेजर पुरुषोत्तम वनकुंद्रे, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस. बी. शिंदे, जनरल मॅनेजर (अकाउंट्स) एल. आर. पाटील, डेप्युटी चीफ केमिस्ट बी. डी. सोमवंशी, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, सहाय्यक ऊस पुरवठा अधिकारी आर. एल. घाडगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत ऊस पीक जगविणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे, हाच आगामी काळातील शेती टिकविण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचा संदेश या गळीत हंगामाच्या शुभारंभातून देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande