
वॉशिंग्टन, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।रशियाच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये स्टारलिंक या उपग्रह इंटरनेट सेवेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले एलन मस्क अडचणीत आले आहेत. युक्रेनमधील स्टारलिंक सेवेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे युक्रेनच्या लष्करी दळणवळण व्यवस्थेवर आणि लष्करी कारवायांवर परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. अमेरिकेतील खासदारांनीही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता हा वाद केवळ इंटरनेट सेवेपुरता मर्यादित राहिलेला नाही. युद्धाच्या काळात एखाद्या खासगी कंपनीच्या निर्णयामुळे एखाद्या देशाच्या संरक्षण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो का, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
युक्रेनचे सैन्य युद्धादरम्यान स्टारलिंक सेवेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ड्रोन उडवणे, गुप्त माहिती गोळा करणे आणि सैनिकांमध्ये संपर्क कायम ठेवणे यांसारख्या कामांसाठी या सेवेचा वापर केला जातो. त्यामुळे इंटरनेट जोडणी खंडित झाल्यास युद्धभूमीवरील अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची दळणवळण सेवा निलंबित करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अमेरिकेतील खासदारांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना, अशा निर्बंधांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फायदा होऊ शकतो, असे म्हटले आहे.दरम्यान, अमेरिकेच्या काँग्रेस सदस्या प्रमिला जयपाल यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युद्धाच्या काळात दळणवळण व्यवस्थेत व्यत्यय आणण्याची ताकद एकाच कंपनीच्या हातात असणे धोकादायक पायंडा ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटिश पत्रकाराशी बोलताना त्यांनी आरोप केला की, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास स्टारलिंक सेवा निलंबित करण्यात आली होती. याचा युक्रेनच्या लष्करी हालचालींवर तसेच रशियन हल्ल्यांचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्नांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.झेलेन्स्की यांच्या मते, स्टारलिंक सेवा केवळ शत्रूवर हल्ला करण्यासाठीच नव्हे, तर नागरिकांचे आणि सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. दळणवळण व्यवस्था खंडित झाल्यास रशियन हल्ले रोखण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात आणि जीवितहानीचा धोका वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मस्क यांचा हा निर्णय गंभीर चूक असल्याचेही झेलेन्स्की यांनी म्हटले.
वाद वाढल्यानंतर एलन मस्क यांनी स्टारलिंक आणि स्टारशील्ड या दोन स्वतंत्र सेवा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्टारलिंक ही स्पेसएक्सची व्यावसायिक उपग्रह इंटरनेट सेवा असून तिचा वापर नागरी तसेच संरक्षणविषयक कामांसाठी केला जाऊ शकतो. मात्र, आक्रमक लष्करी कारवायांसाठी व्यावसायिक सेवेचा वापर करणे योग्य ठरणार नाही, असे मस्क यांनी सांगितले.दुसरीकडे, स्टारशील्ड ही अमेरिकी सरकारच्या मालकीची आणि नियंत्रणाखाली असलेली लष्करी दळणवळण प्रणाली आहे. या सेवेचा वेग किंवा तिच्या वापरावर घालण्यात येणारे निर्बंध अमेरिकी लष्कर आणि अंतिमतः राष्ट्राध्यक्ष ठरवतात, असे मस्क यांनी स्पष्ट केले.
युक्रेनचे माजी संरक्षणमंत्री मिखाइलो फेडोरोव्ह यांनी स्टारलिंकची जोडणी पूर्ववत केली जात असल्याची माहिती दिली. मात्र, स्टारशील्ड सेवेवरील वेगासंबंधीचे निर्बंधही पूर्णपणे हटवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. एका वृत्तानुसार, स्टारशील्ड सेवेवरील निर्बंधांबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांना आधीपासून माहिती नव्हती. तसेच, हा निर्णय अमेरिकेच्या उच्चस्तरीय धोरणाचा भाग नव्हता, असेही अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode