
मॉस्को, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।युक्रेनच्या नौदलाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या वोरोनेझ प्रदेशातील बोरिसोग्लेब्स्क हवाई तळावर रात्रभर करण्यात आलेल्या हल्ल्यात रशियाची सहा एसयू-३४एम लढाऊ विमाने उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्यासाठी नौदलाने नेपच्यून या किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केल्याचे टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून ऊर्जा पायाभूत सुविधांसह जहाजांनाही लक्ष्य करण्याचे हल्ले सुरूच आहेत.
प्रादेशिक गव्हर्नर पावेल माल्कोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दिवसा रशियाच्या रियाझान प्रदेशात युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे एका तेलशुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली. या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू असून, आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी काम करत आहेत, असे माल्कोव्ह यांनी टेलिग्रामवरील पोस्टमध्ये सांगितले.
या प्रदेशातील अन्य एका ठिकाणी असलेल्या गोदामाचेही हल्ल्यात नुकसान झाले आहे. मात्र, याबाबत त्यांनी अधिक तपशील दिला नाही.
रशियाची प्रमुख तेल कंपनी रोसनेफ्टच्या मालकीची रियाझान तेलशुद्धीकरण प्रकल्प मॉस्कोला इंधनाचा पुरवठा करतो. रशियाच्या एकूण तेलशुद्धीकरण क्षमतेपैकी सुमारे पाच टक्के क्षमता या प्रकल्पाची आहे. अलीकडच्या काही महिन्यांत या प्रकल्पाला अनेकदा ड्रोन हल्ल्यांचे लक्ष्य करण्यात आले आहे.माल्कोव्ह यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे रियाझान प्रदेशातील दोन जिल्ह्यांमधील शाळा आणि बालवाड्यांमधील वर्ग रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रशिया आणि युक्रेन ऊर्जा क्षेत्रातील हल्ले थांबवण्यासाठी युद्धविरामास सहमत झाल्याची घोषणा केली होती. मात्र, या युद्धविरामाला दोन्ही देशांपैकी कोणत्याही देशाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode