
अबूजा , 15 ऑक्टोबर (हिं.स.)।नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात लष्करी तळावर बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी किमान १० सैनिकांची हत्या केली, तर २० हून अधिक जणांना जखमी केले.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गुजामाला स्थानिक सरकारी क्षेत्रातील या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी सैनिकांवर मात करत लष्करी वाहनांची नासधूस केली. तसेच जवळच्या मैरारी गावातील काही भागांना आग लावली. माहितीनुसार, या हल्ल्यात २० हून अधिक जण जखमी झाले. याशिवाय किमान पाच नागरिक आणि एका वनरक्षकाचाही मृत्यू झाला.
या घटनेतून बचावलेल्या जिब्रिन हसन या मच्छीमाराने सांगितले की, लष्करी तळावर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी जवळच तलावाच्या काठावर वसलेल्या ‘तुम्बुन बारेबारी’ गावातून ४० हून अधिक होड्या बळजबरीने ताब्यात घेतल्या होत्या.दुसरे मच्छीमार बाबागाना मुहम्मद यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले केले. मात्र, त्यांनी मच्छीमारांना कोणतीही इजा केली नाही.
उल्लेखनीय म्हणजे, नायजेरियाच्या ईशान्य भागात गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेला बंडखोरांचा हिंसाचार रोखण्यासाठी लष्कराकडून अनेक वर्षांपासून मोहीम राबवली जात आहे. असे असतानाही, अलीकडच्या काही आठवड्यांत बोको हराम आणि इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स (आयएसडब्ल्यूएपी) यांसारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांचे हल्ले वाढले आहेत.
गेल्या आठवड्यात नायजेरियन सैनिकांनी बोर्नो राज्यातील एका लष्करी चौकीवर झालेला हल्ला उधळून लावला होता. या कारवाईत आयएसडब्ल्यूएपीच्या २५ हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मात्र, या चकमकीत नायजेरियन लष्कराचे किती नुकसान झाले, याची माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode