
वॉशिंग्टन , 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अडचणीत सोडून रशियासोबत तेल खरेदीचा करार केला आहे. अमेरिकेने स्वतः रशियाकडून तेल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत अमेरिकेची भूमिका अशी होती की, रशियाकडून तेल खरेदी करणारे देश अप्रत्यक्षपणे युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला आर्थिक मदत करत आहेत. मात्र, आता अमेरिकेचाही समावेश रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत झाला आहे.
युक्रेनला दुसरा मोठा धक्का एलन मस्क यांनी दिला आहे. मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने युक्रेनमधील इंटरनेटचा वेग मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. इंटरनेटचा वेग घटल्यामुळे युद्धात युक्रेनची स्थिती कमकुवत झाली आहे. याचा परिणाम लष्करी वापरासाठी असलेल्या उपग्रह टर्मिनल्सवर झाला असून, ते ठप्प पडले आहेत. या टर्मिनल्सचा वापर युक्रेनच्या ड्रोनना हल्ल्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच हवाई संरक्षण यंत्रणेत केला जातो.
लष्करी वापरासाठीच्या उपग्रह टर्मिनल्सनी काम करणे बंद केल्यामुळे युक्रेनला रशियाच्या हद्दीत ड्रोन हल्ले करणे आणि रशियन ड्रोनचे हल्ले रोखणे, या दोन्ही गोष्टी कठीण झाल्या आहेत. त्यामुळे युक्रेनला आता ना रशियावर प्रभावीपणे हल्ले करता येत आहेत, ना स्वतःवर होणारे हल्ले रोखणे सोपे राहिले आहे.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत एलन मस्क यांच्याकडे तक्रार केली असता, मस्क यांनी स्पष्ट केले की, स्पेसएक्सच्या ‘स्टारशील्ड’ या लष्करी उपग्रह सेवेवर निर्बंध घालण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही, तर तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे झेलेन्स्की संतप्त झाले आहेत. मात्र, त्यांच्याकडे यावर कोणताही प्रभावी पर्याय नसल्याचे चित्र आहे. अमेरिकेच्या या विश्वासघातामुळे हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना याची जाणीव असूनही त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.झेलेन्स्की म्हणाले, “हा खरोखरच मोठा विश्वासघात आहे. हा अत्यंत कठीण काळ आहे. आम्हाला युक्रेनचे संरक्षण करायचे आहे; मात्र इंटरनेट सेवा जणू बंदच करण्यात आली आहे. असा निर्णय ते कसा घेऊ शकतात, हे समजणे कठीण आहे. ही खूप मोठी चूक आहे. यामुळे हजारो लोकांचे मोठे नुकसान होईल.”
ट्रम्प सातत्याने झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा देत असताना अचानक अमेरिकेने आपली भूमिका बदलल्याचे पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारत आणि चीनसारख्या देशांवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, या देशांवर शुल्कही लादले होते. मात्र, आता तेच ट्रम्प रशियाकडून आनंदाने तेल खरेदी करत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेच्या भूमिकेत इतक्या कमी वेळात वारंवार बदल होत असल्याने या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्यासोबत डिझेल खरेदीचा करार झाल्यानंतर रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode