पाकिस्तानातील पेशावर शाळा दुर्घटना: मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल; ३५ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेचे छत कोसळून ३५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे मालक, भागधारक आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत ३४ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्
पाकिस्तानातील पेशावर शाळा दुर्घटना: मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल; ३५ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेचे छत कोसळून ३५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे मालक, भागधारक आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत ३४ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता, तर ५२ जण जखमी झाले होते. पोलिसांनी गुरुवारी शाळेच्या मालकाला अटक केली होती. आता या प्रकरणात नामनिर्देशित करण्यात आलेल्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावरच्या डिर कॉलनी परिसरात असलेल्या अल-खैर एज्युकेशन सिस्टिम या शाळेच्या इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वीही इमारतीच्या भिंती आणि छतांची दुरवस्था झाल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने या तक्रारींकडे कथितरीत्या दुर्लक्ष केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.गुरुवारी शाळेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील नर्सरीचा वर्ग आणि तळमजल्यावरील काही खोल्यांची छते कोसळली होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली.

एफआयआरनुसार, शाळेची इमारत १६ मरला जमिनीवर बांधण्यात आली होती. ही जमीन वहीद आणि जावेद यांच्या मालकीची होती. २०२४ मध्ये ही जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. त्यानंतर इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली.या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तान दंड संहितेच्या कलम १४८, १४९ आणि ३२२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी खैबर पख्तूनख्वाचे मुख्य सचिव यांनी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. इमारतीची मजबुती, बांधकामाचा दर्जा, सुरक्षाव्यवस्था आणि संभाव्य निष्काळजीपणा या बाबींची समितीकडून चौकशी केली जाणार आहे. याशिवाय, शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठीही सरकारकडून यंत्रणा तयार केली जाणार आहे.

दरम्यान, प्रांतीय सरकारने दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे ३.४२ लाख भारतीय रुपये) आणि जखमी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande