सणांच्या पार्श्वभूमीवर पथदिव्यांच्या वेळेत तातडीने बदल करावा - नगरसेवक निलेश देव
अकोला, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अकोला शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सध्या ठरावीक वेळेनुसार बंद केला जात असल्यामुळे पहाटेच्या व रात्रीच्या वेळेत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा आणि आगामी दिवाळ
सणांच्या पार्श्वभूमीवर पथदिव्यांच्या वेळेत तातडीने बदल करावा - नगरसेवक निलेश देव


अकोला, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अकोला शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सध्या ठरावीक वेळेनुसार बंद केला जात असल्यामुळे पहाटेच्या व रात्रीच्या वेळेत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा आणि आगामी दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर पथदिव्यांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी केली आहे.

याबाबत अकोला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पथदिव्यांचा वेळ बदलण्याची मागणी केली आहे. सध्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सकाळी ६ वाजता बंद व रात्री ७.१५ वाजता सुरू करण्याचे वेळापत्रक आहे. मात्र हिवाळ्यात सकाळी उशिरा उजाडते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडतो. त्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासून शहरातील अनेक भाग पूर्णपणे अंधारात राहत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात महिलांची, नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची

सध्या नवरात्रोत्सव व दसरा सुरू असून धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दिवाळीचे सण जवळ आले आहेत. या काळात पहाटेपासून नागरिकांची मंदिरांकडे, कार्यक्रमस्थळी तसेच बाजारपेठांकडे वर्दळ वाढते. महिलांची, ज्येष्ठ नागरिकांची, विद्यार्थी-विद्यार्थिनींची आणि कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा परिस्थितीत शहरातील रस्ते व चौक अंधारात ठेवणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यासारखे आहे, असा सवाल निलेश देव यांनी उपस्थित केला.

“सण साजरे करताना अकोलेकरांना अंधारात का ठेवायचे?”

निलेश देव म्हणाले, “महानगरपालिका आणि महावितरणने केवळ कागदी वेळापत्रक पाहून निर्णय घेऊ नये. ऋतुमानानुसार आणि नागरिकांच्या गरजेनुसार पथदिव्यांचा वेळ बदलणे आवश्यक आहे. नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा आणि दिवाळीसारखे सण असताना नागरिक पहाटेपासून व रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. अशावेळी रस्त्यांवरील दिवे बंद ठेवून अकोलेकरांना अंधारात ठेवणे योग्य नाही.”

त्यांनी पुढे मागणी केली की, सध्याच्या परिस्थितीत पथदिव्यांचा वीजपुरवठा संध्याकाळी ५.४५ वाजता सुरू करून सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवावा. तसेच पुढील काळात सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळेनुसार पथदिव्यांचे वेळापत्रक नियमितपणे बदलण्यात यावे.

महापालिकेचे पत्र; महावितरणकडे सहकार्याची अपेक्षा

महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रातही हिवाळ्यात सकाळी ६ वाजता दिवस पूर्णपणे उजाडलेला नसतो, तसेच संध्याकाळी लवकर अंधार पडतो, याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे रात्री अंधार होण्यापूर्वी पथदिवे सुरू आणि सकाळी उजेड होण्यापूर्वी बंद करण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

“अकोलेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने याबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सणासुदीच्या काळात शहर प्रकाशमय असले पाहिजे, अंधारमय नाही,” असा स्पष्ट इशारा निलेश देव, गटनेता तथा नगरसेवक, वंचित बहुजन आघाडी, अकोला यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande