नाशिक सिडकोत रबडीच्या सीताफळ गरात आढळल्या अळ्या; नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नाशिक, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। सिडकोतील श्री राम रबडीवाला या आस्थापनेत रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या गरामध्ये आळ्या आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने निलंब
CIDCO sells custard apple


CIDCO sells custard apple


अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। सिडकोतील श्री राम रबडीवाला या आस्थापनेत रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या गरामध्ये आळ्या आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने निलंबित केले. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) केलेल्या तपासणीत अन्नपदार्थांच्या स्वच्छतेसह आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले.

अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि संकेत येलमामे यांनी राजीव गांधी मार्केट, पाटीलनगर, सिडको येथील श्री राम रबडीवाला या आस्थापनेची तपासणी केली. या वेळी रबडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या गरामध्ये आळ्या आढळल्या. तसेच स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.

अन्न सुरक्षा नियमांतील स्वच्छतेसंबंधीच्या तरतुदी तसेच परिशिष्ट चारमधील निकषांचे उल्लंघन झाल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने निलंबित करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, हाताळणी व विक्री करताना स्वच्छतेचे निकष पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत, स्वच्छतेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहआयुक्त मंगेश माने यांनी केले आहे. नाशिक विभागातील तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande