
नाशिक, 16 ऑक्टोबर, (हिं.स.) : स्वस्त धान्य दुकानांवरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील पारदर्शकतेचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (WFP - World Food Programme) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली 'अन्नपूर्ती' स्वयंचलित धान्य वितरण प्रणाली म्हणजेच 'धान्य एटीएम' (Foodgrain ATM) नाशिकमध्ये कार्यान्वित होत आहे.
या अत्याधुनिक धान्य एटीएमचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डिस्टिलरी क्वार्टर, गोरेवाडी रोड, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ, नाशिक रोड, नाशिक येथे होणार आहे. या प्रणालीमुळे आता रेशनधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य कोणत्याही वेळी स्वतः काढता येणार आहे.
*'अन्नपूर्ती' धान्य एटीएमची प्रमुख वैशिष्ट्ये* :
* २४x७ रेशन सुविधा* : हे केंद्र दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू राहील. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कधीही धान्य घेता येईल.
*जलद वितरण* : केवळ ३५ सेकंदात २५ किलोपर्यंत धान्याचे अचूक वितरण करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे.
*बायोमेट्रिक सुरक्षा व अचूकता* : आधार कार्डवर आधारित फिंगरप्रिंट (बायोमेट्रिक) प्रमाणीकरण केल्यामुळे अन्नधान्य वितरणात ९९.९९% अचूकता राहील आणि गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसेल.
*मोठी साठवणूक क्षमता* : या एटीएमची साठवणूक क्षमता २५०० किलोग्रॅम (२५ क्विंटल) इतकी असून, याद्वारे गहू आणि तांदळासह विविध धान्यांचे पारदर्शक व सुरक्षित वितरण केले जाईल.
*'वन नेशन, वन रेशन कार्ड'ला (ONRC) समर्पित)* : या राष्ट्रीय योजनेला हे मशीन पूर्णपणे समर्पित असून, बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील स्थलांतरित लाभार्थी देखील याचा लाभ घेऊ शकतील.
*डिजिटल पेमेंट सुविधा* : भविष्यातील गरजा लक्षात घेऊन यामध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा देखील अंतर्भूत करण्यात आली आहे.
*धान्य एटीएम कसे चालवावे? - वापराची सोपी पद्धत*
१. मशीनसमोरील निश्चित ठिकाणी आपले रेशन कार्ड ठेवावे.
२. ePOS यंत्रावर आपला रेशन कार्ड क्रमांक टाईप करून 'पडताळणी' (Verify) करावी.
३. आधार-आधारित बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) प्रमाणीकरण करावे.
४. स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या रेशनच्या प्रमाणाची खात्री (पुष्टी) करावी.
५. धान्य बाहेर येण्याच्या जागेखाली आपले रिकामे भांडे किंवा पिशवी ठेवावी.
६. स्क्रीनवरील 'वितरण सुरू करा' हे बटण दाबावे.
७. काही सेकंदात निर्धारित प्रमाणात धान्य पिशवीत जमा होईल.
८. रेशन मिळाल्यानंतर स्क्रीनवरील अंतिम पृष्ठ तपासावे.
मशीन हाताळताना कोणतीही अडचण आल्यास त्यावर दिलेल्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI