
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते वजन हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असून, यावर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या तुलनेत मर्यादित असणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपर्यंत दप्तराचे वजन ठेवण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमध्ये नियमांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाताना पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे जड दप्तर वाहून न्यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांमध्ये दप्तराच्या वजनासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व शहराध्यक्ष सौरभ भगत यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अकोला यांना दिले.यावेळी विभागाध्यक्ष अमोल भेंडारकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे