अकोला - परिचारिकांची ५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ५ हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरण्यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS), आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यव्या
Photo


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ५ हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरण्यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS), आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. शासन व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पासून नागपूर येथील सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच, शासनाने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन लेखी आश्वासन न दिल्याने १५ ऑक्टोबर २०२६ पासून अकोल्यासाह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

कंत्राटी पदभरती रद्द करून सरळसेवेने कायमस्वरूपी परिचारिकांची पदभरती करावी., पदभरती प्रक्रियेतील ८०:२० चे प्रमाण रद्द करावे.

पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती द्यावी. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या (MNC) नोंदणी नूतनीकरणासाठी अनिवार्य असलेली सीएनई (CNE) ची अट रद्द करावी.केंद्र शासनाच्या धर्तीवर परिचारिकांना ९,००० रुपये नर्सिंग भत्ता लागू करावा. परिचर्या संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पदनामांमध्ये आवश्यक बदल करावेत. पाठ्यनिर्देशिका पदावरील प्रतिनियुक्तीसाठी एम.एस्सी. नर्सिंगची अट रद्द करून पी.बी.बी.एस्सी. नर्सिंग व बी.एस्सी. नर्सिंग पात्रताधारकांना समान संधी द्यावी. तसेच, राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना प्रथम संधी द्यावी. संबंधित कर्मचाऱ्याने प्रतिनियुक्ती नाकारल्यास पुढील सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्याला संधी द्यावी.अश्या विविध परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता व्हावी, कर्मचाऱ्यांना सेवाविषयक न्याय मिळावा तसेच पदभरती आणि पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक करणे आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व व्यावसायिक हितांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, ठोस निर्णयाऐवजी केवळ मौखिक आश्वासने मिळाल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

शासन व प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन त्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा, मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) आरोग्य विभागाच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती मनिषा इंगोले , जिल्हा उपाध्यक्ष आशिष तायडे , महासचिव आशिष गायकवाड , कार्याध्यक्ष सुमेध वानखडे , संकेत संदांशिव , सतिष चौतमल , सुशील , सचिन दांगट ,आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू आहे. परिचारिकांच्या रिक्त पदांची भरती, प्रलंबित सेवाविषयक मागण्यांची पूर्तता आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande