
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। - घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार संजय दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी देशमुख नावाचा इसम हा श्रमिकनगर येथे रामेश्वर नागरे यांच्या प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या भरताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याकडील आढळून आलेले गॅस भरण्यासाठीचे पिस्टल, इलेक्ट्रिक मोटार, लोखंडी हॅण्डसह एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, तीन भरलेले गॅस सिलिंडर असा एकूण ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देसले करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI