
रियाध, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। सौदी अरेबियाने मक्का येथील एका मशिदीत अनैतिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेल्या बांगलादेशच्या दोन नागरिकांना फाशीची शिक्षा दिली आहे. बांगलादेशातील वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, जेद्दाह येथील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासाला या फाशीबाबत आधी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आणि सरकारी प्रेस एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मक्का प्रांतात या दोघांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाची अधिकृत पुष्टी मिळवण्यासाठी जेद्दाह येथील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासाने सौदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
वाणिज्य दूतावासातील एका अधिकाऱ्याने गुरुवारी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे सांगितले, “मंत्रालयाने वाणिज्य दूतावासाला याबाबत आधी कोणतीही माहिती दिली नव्हती.” ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाची अधिकृत पुष्टी मिळावी, अशी विनंती करणारे औपचारिक पत्र आम्ही सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला सादर केले आहे.”
सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फाशी देण्यात आलेल्या व्यक्तींची नावे नजरुल इस्लाम अब्दुल बशीर आणि सिती अख्तर अशी आहेत. सौदी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दोघांना अटक केली होती. त्यानंतर तपासाच्या आधारे त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आणि हे प्रकरण सक्षम न्यायालयाकडे सोपवण्यात आले. न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करून दोघांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.या दोघांना इस्लामी कायद्यातील ‘ताझीर’ या तरतुदीनुसार फाशी देण्यात आली. या तरतुदीनुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाला शिक्षेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो. गुन्ह्याचे गांभीर्य तसेच पवित्र स्थळ आणि वेळेच्या पावित्र्याचा भंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सौदी गृह मंत्रालयाने या शिक्षेचे समर्थन केले.
निवेदनानुसार, संबंधित प्राधिकरणाने न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि त्यामुळे तो अंतिम ठरला.त्यानंतर फाशी देण्यासाठी शाही आदेश जारी करण्यात आला. मात्र, या दोघांनी मशिदीच्या आत नेमके कोणते कृत्य केले होते, याबाबत सौदी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, संबंधित मशिदीचे नाव किंवा दोघांना अटक कधी करण्यात आली, याचाही उल्लेख निवेदनात नाही. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.
फाशी देण्यापूर्वी कोणतीही माहिती मिळाली नसल्याने जेद्दाह येथील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासाने हा मुद्दा सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे औपचारिकरीत्या उपस्थित केला आहे. राजनैतिक पत्राद्वारे या फाशीच्या शिक्षांची अधिकृत पुष्टी करण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, उपलब्ध निवेदनांमध्ये या राजनैतिक संवादाबाबत किंवा प्रकरणाच्या नेमक्या परिस्थितीबाबत यापुढील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode