
रत्नागिरी, 18 ऑक्टोबर (हिं.स.) । मंडणगड पोलीस ठाण्यात १९९२ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील ३४ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन फरारी आरोपींना जेरबंद करण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘रेड्स ॲप’च्या (RAIDS App) मदतीने आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण करून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यात धडक कारवाई करत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
मंडणगड पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गेल्या ३४ वर्षांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. काल, दि. १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील हुन्सूर परिसरामधून मधुराज पुटरंग पहाडी राजपूत आणि सुब्रमणी चिन्नाराजू पहाडी राजपूत (दोघे रा. हुन्सूर पक्षी राजपूर, राज्य कर्नाटक) या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने ताब्यात घेतले.
या तपासात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विकसित केलेले ‘रेड्स ॲप’ अत्यंत प्रभावी ठरले. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या या ॲपच्या माध्यमातून फरार व पाहिजे असलेले आरोपी तसेच बेपत्ता व्यक्तींच्या छायाचित्रांचे एकूण १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते. या गुन्ह्यातील आरोपींची छायाचित्रे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुनर्निर्मित करण्यात आली आणि स्थानिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या नेटवर्कच्या बळावर पोलिसांनी संशयितांचा अचूक माग काढून त्यांना कर्नाटकातून गजाआड केले. तब्बल तीन दशकांनंतर लागलेल्या या शोधामुळे रत्नागिरी पोलिसांच्या आधुनिक तपास पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी