
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पनवेल परिमंडळ-३ पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४८ गुन्ह्यांची उकल करून तब्बल १ कोटी २२ लाख ९४ हजार २६७ रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. या कारवाईमुळे चोरीच्या घटनांत आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३ अंतर्गत पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर आणि तळोजा या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे विविध गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती हस्तगत केली. त्यानंतर संबंधित तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला.
या कारवाईत १४० मोबाईल फोन, १२९ ग्रॅम सोने, ४७ तोळे चांदी, आठ वाहने आणि १७ लाख ३४ हजार ७०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. याशिवाय अन्य मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे. एकूण ४८ गुन्ह्यांची उकल करून एवढ्या मोठ्या किमतीची मालमत्ता परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.
मोबाईल, दागिने, वाहने आणि रोकड चोरीला गेल्यानंतर नागरिकांना आर्थिक नुकसानाबरोबरच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मालमत्ता परत मिळवून देण्याची ही कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासकामगिरीचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)