
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
अवैध गावठी दारूच्या वाहतुकीविरोधात रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई करत ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ३ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास अलिबाग-रोहा मार्गावरील वावे नाका ते वळवळी गावादरम्यान करण्यात आली.
या कारवाईत सुमारे तीन लाख रुपये किमतीची कार आणि रबरी ट्यूबमध्ये भरलेली गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली. ही दारू विक्रीसाठी पुरवठा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहून नेली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर पाटील पुढील तपास करीत आहेत. अवैध दारूची वाहतूक आणि विक्रीसाठी होणारा पुरवठा रोखण्यासाठी रेवदंडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यव्यवसायाविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)