‘इराणवर हल्ला केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल’; नव्या संरक्षणमंत्र्यांचा अमेरिकेला इशारा
तेहरान , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणचे नवनियुक्त संरक्षणमंत्री मेहरदाद अखलाघी यांनी संसदेचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लगेचच अमेरिका आणि मध्यपूर्वेतील तिच्या सहयोगी देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. रविवारी त्यांनी स्पष्ट केल
‘इराणवर हल्ला केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल’; नव्या संरक्षणमंत्र्यांचा अमेरिकेला इशारा


तेहरान , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणचे नवनियुक्त संरक्षणमंत्री मेहरदाद अखलाघी यांनी संसदेचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लगेचच अमेरिका आणि मध्यपूर्वेतील तिच्या सहयोगी देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. रविवारी त्यांनी स्पष्ट केले की, वॉशिंग्टनने इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यास अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.

इराणी प्रसारमाध्यमांनुसार, इराणच्या इस्लामिक सल्लागार सभेने मेहरदाद अखलाघी यांना संरक्षण आणि सशस्त्र दलांच्या रसद व्यवस्थापनमंत्रीपदी मंजुरी दिली आहे. संसदेतील एकूण २७७ मतांपैकी २३७ मते अखलाघी यांच्या बाजूने पडली.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अखलाघी म्हणाले, “जनतेने निश्चिंत राहावे. अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांमध्ये आमच्यावर हल्ला करण्याचे धाडस होणार नाही. त्यांनी तसे केलेच, तर त्यांना आणि संपूर्ण प्रदेशाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.”

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या सुरुवातीच्या हवाई हल्ल्यांनंतर सुमारे आठ महिन्यांनी अखलाघी यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. ते अझीझ नासिरजादेह यांची जागा घेतील. २८ फेब्रुवारी रोजी एका नेतृत्व संकुलावर झालेल्या हल्ल्यात नासिरजादेह यांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक वरिष्ठ लष्करी कमांडरही मारले गेले होते.

वृत्तानुसार, संसदेतील मतदानापूर्वी अखलाघी यांनी सांगितले होते की, अत्यंत संवेदनशील परिस्थितीत संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येत आहे. देशाच्या संरक्षणासाठी सध्याच्या परिस्थितीचे अचूक आकलन करणे आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या सर्व संभाव्य परिस्थितींचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. मेहरदाद अखलाघी यांच्याकडे कोणतेही लष्करी पद किंवा दर्जा नसला, तरी त्यांना संरक्षण मंत्रालयातील कामाचा ४२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. २०१३ पासून ते इराणच्या प्रमुख शस्त्रनिर्मिती संस्थेचे, म्हणजेच इराणी संरक्षण उद्योग संघटनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, अण्वस्त्र कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित हालचालींमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्ये अखलाघी यांच्यावर निर्बंधही लादले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande