
वॉशिंग्टन, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।फ्रान्समध्ये महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांचा संताप आता हिंसक संघर्षात रूपांतरित होताना दिसत आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये हजारो लोक आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होत असून, तर काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समधील आंदोलनांवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. फ्रान्स हा क्रांतीसाठी प्रसिद्ध देश असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत फ्रान्समधील सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. एका काल्पनिक संभाषणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांकडून ५,००० डॉलर मिळाल्यानंतर चीनला फिरायला जाण्याची आणि त्यानंतर जपानला जाण्याची चर्चा होते. यानंतर फ्रान्सचा उल्लेख करत त्यांनी उपहासाने म्हटले की, फ्रान्सलाही फिरायला जाण्याचा पर्याय आहे, कारण तो एक सुंदर देश आहे; तिथे ना दंगली होतात, ना क्रांती! मात्र, लगेचच त्यांनी टोला लगावत फ्रान्समधील लोकांना क्रांती करण्यात काहीसे जास्तच कौशल्य असल्याचे म्हटले.
फ्रान्समधील अनेक भागांत सरकार आणि सद्यस्थितीविरोधातील नाराजी रस्त्यावर उतरून व्यक्त केली जात असताना ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी फ्रान्समधील अशांततेवरून पाश्चात्त्य उदारमतवादी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विविधता आणि सहानुभूतीच्या नावाखाली इतर देशांतील लोकांना पाश्चात्त्य समाजांमध्ये स्थायिक होण्यास प्रोत्साहन देण्यात आले; मात्र, लोकांमधील समन्वय आणि सामाजिक एकात्मता यांसारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
फ्रान्समधील ऐतिहासिक इमारतींना आग लावण्याच्या घटनांबद्दलही व्हान्स यांनी चिंता व्यक्त केली. परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, अमेरिकन नागरिकांनाही सावध करत त्यांनी फ्रान्समधील या परिस्थितीचा संबंध डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणांशी जोडण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode