
ओटावा, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील सीएफबी वेनराइट या लष्करी तळावर शनिवारी भीषण आग लागल्याने अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, मृत आणि जखमींची नेमकी संख्या अधिकाऱ्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही. या घटनेबद्दल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि संरक्षणमंत्री डेव्हिड मॅकगिन्टी यांनी दुःख व्यक्त केले आहे. कॅनडाचे सशस्त्र दल स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी आणि दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी समाजमाध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, अल्बर्टा येथील सीएफबी वेनराइट लष्करी तळावर एका गंभीर घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या लष्करी जवानांप्रति आणि इतर नागरिकांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. संरक्षणमंत्री डेव्हिड मॅकगिन्टी यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले. प्रभावित लष्करी जवान आणि इतर नागरिकांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नेमकी संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हा लष्करी तळ वेनराइट शहराजवळ असून, एडमंटन शहराच्या आग्नेयेला सुमारे १८० किलोमीटर अंतरावर आहे. वेनराइटच्या नगरपालिका जिल्हा प्रशासनानुसार, शनिवारी लागलेली आग जोरदार वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि लष्करी तळाच्या कुंपणापर्यंत पोहोचली. मात्र, आग नेमकी कधी आणि कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळाच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचेही नागरिकांना सांगण्यात आले आहे.
संरक्षणमंत्री मॅकगिन्टी यांनी परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून, ती वेगाने बदलत असल्याचे सांगितले. कॅनडाचे सशस्त्र दल स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी आणि दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची घटना घडल्याचे आपल्याला आठवत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीएफबी वेनराइट हा कॅनडातील सर्वाधिक व्यस्त लष्करी प्रशिक्षण तळांपैकी एक आहे. वृत्तानुसार, प्रत्यक्ष शस्त्रे आणि दारूगोळ्याचा वापर करून केल्या जाणाऱ्या लष्करी सरावांसाठी हा तळ प्रमुख केंद्र आहे. वृत्तानुसार, सामान्य दिवसांत या तळावर सुमारे ६९० लष्करी जवान आणि ३०० नागरी कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, आग लागली तेव्हा तळावर नेमके किती लोक उपस्थित होते, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
अल्बर्टाच्या मुख्यमंत्री डॅनिएल स्मिथ यांनी या आगीच्या घटनेला गंभीर आणि दुःखद म्हटले आहे. या दुर्घटनेमुळे प्रांतातील अनेक लष्करी जवान प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार, अल्बर्टा सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील कॅनडाच्या केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क साधत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही सरकारे समन्वयाने काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode