
वॉशिंग्टन , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांना ‘बंधुआ मजूर’ असे संबोधणे ही शब्दांची चुकीची निवड होती, अशी कबुली दिली आहे. भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने या टिप्पणीला अत्यंत आक्षेपार्ह आणि वसाहतवादी मानसिकतेची आठवण करून देणारी ठरवल्यानंतर व्हान्स यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना व्हान्स यांनी स्पष्ट केले की, त्यांची टीका एच-१बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांवर नव्हती, तर अमेरिकन कंपन्या आणि सध्याच्या व्हिसा व्यवस्थेवर होती.या कार्यक्रमादरम्यान एका भारतीय-अमेरिकन नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्हान्स यांनी आपल्या शब्दांची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, “माझ्या शब्दांच्या निवडीत काही चूक झाली असेल, तर त्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, माझी टिप्पणी एच-१बी व्हिसाधारकांवर टीका करण्यासाठी नव्हती. मी या शब्दाचा वापर करतो, तेव्हा माझा रोख अशा कंपन्यांवर असतो, ज्या कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत अडकवतात.”
व्हान्स यांनी असा युक्तिवाद केला की, सध्याची एच-१बी व्हिसा व्यवस्था परदेशी कर्मचाऱ्यांना अत्यंत असुरक्षित स्थितीत आणते. कारण अमेरिकेतील त्यांचा कायदेशीर दर्जा पूर्णपणे त्यांच्या नियोक्त्यावर अवलंबून असतो. नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांशी असलेले मतभेद किंवा तक्रारी मांडता येत नाहीत. नोकरी गेल्यास त्यांना मायदेशी परतावे लागू शकते. त्यामुळे या व्यवस्थेमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांवर अत्यधिक नियंत्रण आणि अनुचित अधिकार मिळतात, असे व्हान्स यांनी सांगितले.
स्थलांतराबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना व्हान्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि कुटुंबाचाही उल्लेख केला. पत्नी उषा व्हान्स यांच्या आई-वडिलांचा संदर्भ देत ते म्हणाले, “माझे कुटुंब कुठून आले आहे, हे तुम्हाला माहीत आहे. माझे सासू-सासरे दक्षिण भारतातून अमेरिकेत आले होते. त्यांची मुलगी येथे जन्मली असून, आज ती अमेरिकेची सेकंड लेडी आहे. मला त्यांचा खूप अभिमान आहे.”
स्थलांतरितांना अमानवी पद्धतीने सादर करण्याचा आपला कधीही हेतू नव्हता, असेही व्हान्स यांनी स्पष्ट केले. परदेशी व्यावसायिकांचे स्वागत करणे आणि देशातील स्थानिक कामगारांच्या हितांचे संरक्षण करणे, या दोन्ही बाबींमध्ये अमेरिकेला योग्य संतुलन साधण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर व्हान्स यांचे हे स्पष्टीकरण समोर आले आहे. मंत्रालयाने अशा प्रकारच्या शब्दप्रयोगाला अनुचित आणि आक्षेपार्ह ठरवले होते.अशा विधानांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था, तांत्रिक नवोन्मेष आणि संशोधन क्षेत्रात भारतीय व्यावसायिकांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे भारताने म्हटले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode