
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीचा निर्धार करत केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात, दुष्काळ निवारणातील अपयशाविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कारभाराविरोधात जोरदार एल्गार पुकारला. निलंग्यातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीनंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौकात वोट बचाओ, देश बचाओ अंतर्गत भव्य निदर्शने करण्यात आली; तर त्यानंतर पक्षाच्या प्रमुख शिष्टमंडळाने थेट तालुक्यातील झरी गावात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला.
हा संपूर्ण दौरा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सह-प्रभारी रेहाना चिश्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी व निर्दयी: रेहाना चिश्ती
दिवसाची सुरुवात सिद्धेश्वर मंगल कार्यालयातील लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी व आढावा बैठकीने झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन, बीएलए (BLA-1 व BLA-2) च्या माध्यमातून मतदार याद्यांचे सूक्ष्म नियोजन आणि बूथ स्तरावरील रचना यावर बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.
बैठकीला संबोधित करताना सह-प्रभारी रेहाना चिश्ती यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर कडाडून हल्ला चढवला. धाराशिवहून लोहारामार्गे निलंग्याकडे येताना रस्त्यात पाहिलेल्या एका बैलगाडीतील जर्जर शेतकऱ्याचा भावनिक दाखला देत त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. येथे उद्योगपतींकडे खाजगी विमाने आणि आलिशान गाड्या आहेत; मात्र मराठवाड्यातील बळीराजा आजही पारंपरिक साधनांनी आणि पाण्याविना अत्यंत हलाखीच्या स्थितीत शेती करतो आहे. बड्या उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज सहज माफ केले जाते, पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला केवळ ५ हजार रुपयांची तुटपुंजी मदत देऊन त्याचा अपमान केला जातो. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांचे हे दुःख मी जवळून जाणते. कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या घराघरांत जाऊन त्यांच्या हक्कासाठी लढा द्या. गरज पडल्यास प्रशासनाला घेराव घाला, मी स्वतः तुमच्यासोबत रस्त्यावर उतरायला तयार आहे.
निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर केंद्राचा दबाव असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी मतदार याद्यांमधून सामान्य व वंचित घटकांची नावे वगळण्याच्या प्रकारावर (एसआयआर) तीव्र आक्षेप घेतला. बीएलए कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांच्या पडताळणीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पक्षशिस्त आणि अनुशासनहीनतेवर कडक भूमिका: १९ पदाधिकाऱ्यांना नोटिसा
पक्षसंघटनेत कोणतीही अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत रेहाना चिश्ती यांनी कार्यकर्त्यांना पक्षशिस्त पाळण्याचे अत्यंत कडक निर्देश दिले. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला ५४ पैकी ३५ पदाधिकारी उपस्थित राहिल्याची गंभीर नोंद घेत गैरहजर राहिलेल्या १९ पदाधिकाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाध्यक्षांना दिले. पक्षात निव्वळ पदे भूषवून काम न करणाऱ्यांना कोणतीही संधी मिळणार नाही, तर निष्ठावान आणि जमिनीवर सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पुढे आणले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तसेच कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद, हेवेदावे अथवा टीका-टिप्पणी जाहीरपणे किंवा सोशल मीडियावर न मांडता थेट आपल्याकडे मांडाव्यात; त्यावर योग्य दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील संपूर्ण संघटनात्मक काम आता थेट आपल्या देखरेखीखाली चालणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सर्वांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल: अभय साळुंके
प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा सविस्तर आढावा मांडला. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांनंतर लातूर जिल्ह्यात काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची पूर्ण ताकदीने रचना झाली असून ब्लॉक, मंडळ, सेक्टर तसेच युवक व महिला काँग्रेससह सर्व आघाड्यांची पुनर्रचना वेगाने पूर्ण केली जात आहे. गेल्या १०–१२ वर्षांपासून सत्ता नसतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने संघर्ष केला आहे. आज लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्ष थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न मांडत आहेत. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना गावोगावी अधिक भक्कम होत आहे. राजकीय वातावरण वेगाने बदलत असल्याने कार्यकर्त्यांच्या या कष्टाचे फळ नजीकच्या भविष्यात नक्कीच दिसेल.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात धडक निदर्शने
कार्यकारिणी बैठक संपताच काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. राज्यातील दुष्काळ निवारणात महायुती सरकारला आलेले अपयश, शेतकऱ्यांना जाहीर केलेली तुटपुंजी मदत आणि निवडणूक आयोगाचा संशयास्पद कारभार याविरोधात वोट बचाओ, देश बचाओ अभियानांतर्गत जोरदार घोषणाबाजी करत धडक निदर्शने करण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलताना सह-प्रभारी रेहाना चिश्ती यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि मतचोरी प्रकरणावर कडाडून टीका केली.
देशातील कोट्यवधी जनतेशी आणि लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्यांवर तातडीने एफआयआर दाखल करून त्यांना पदावरून हटवावे, तसेच उर्वरित आयुष्य तुरुंगातच घालवावे लागेल अशी कठोर कायदेशीर शिक्षा करावी, अशी संतप्त मागणी त्यांनी केली.
त्याचवेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सरकारवर तोफ डागत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये तात्काळ थेट मदत देण्याची मागणी केली. गेल्या वर्षीचा ओला आणि यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, महागाई गगनाला भिडलेली असताना सरकारने केवळ ५ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला. ही मागणी मान्य होईपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा देत संविधानाने दिलेला मताधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व मतचोरी रोखण्यासाठी आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका साळुंके यांनी मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis